पुणे – एटीएम कार्डद्वारे फसवणुकीच्या तक्रारी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना यातून वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना आता ओटीपी द्यावा लागणार आहे. हा ओटीपी ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवला जाईल. नंबर पडताळणी झाल्यानंतर ग्राहक एटीएममधून पैसे काढू शकणार आहेत.
एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ग्राहकांना या निर्णयाची माहिती दिली आहे. एसबीआयच्या एटीएमवर रोख रक्कम काढण्यासाठी आमची ओटीपी प्रणाली फसवणूक करणार्यांविरोधात एक महत्त्वाचे पाऊल आहे. ग्राहकांची फसवणूक टाळणे हे आमचे प्राधान्य असेल, असे एसबीआयने ट्विटरवर म्हटले आहे.
एसबीआयच्या एटीएममधून ओटीपीद्वारे पैसे काढण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने खूपच सोपी पद्धत अवलंबली आहे. याचा वापर करताना तुमच्या मोबाईल नंबरवर चार आकड्यांचा ओटीपी पाठवला जाईल. तुम्हाला किती पैसे काढायचे असले तरी हा ओटीपी त्यावर नोंदवायचा आहे. एटीएम स्क्रिनवर एक विंडो प्रदर्शित केली जाईल तिथे तो ओटीपी नोंदवावा लागेल.
या सेवेचा लाभ फक्त एसबीआय एटीएम कार्डधारकांना एसबीआयच्याच एटीएमवर मिळणार आहे. दुसर्या बँकांच्या एटीएम कार्डसाठी ही सुविधा पुरविण्यात आलेली नाही. यापूर्वी एसबीआयने वरिष्ठ नागरिकांसाठी एक भेट दिली होती. एसबीआयच्या विशेष मुदतठेव योजनेत (फिक्स डिपॉझिट) योजनेचा फायदा मार्च २०२२ पर्यंत मिळणार आहे. या विशेष योजनेची मुदत वाढविण्यात आली आहे.