नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामधील ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयच्या ग्राहकांना शनिवार (४ सप्टेंबर) आणि रविवारी (५ सप्टेंबर) ऑनलाइन सेवांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री १०.३५ वाजेपासून ते रविवारी रात्री १.३५ वाजेपर्यंत इंटरनेट बँकिंग सेवा बंद राहणार आहे. एसबीआयने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. यादरम्यान, एसबीआयची इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट, योनो बिझनेस, आयएमपीएस, यूपीआय ह्या सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना इंटरनेट बँकिंगची कामे आधीच आटोपून घ्यावी लागणार आहे. अन्यथा ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागेल. ग्राहकांना होणार्या असुविधेबाबत एसबीआयने दिलगिरी व्यक्त केली आहे. सध्या ग्राहक ऑनलाइन बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मोबाईल आणि लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाइन सेवेचा लाभ घेतला जातो. त्यामुळे ऑनलाइन सेवा बाधित झाल्यास ग्राहकांना समस्या उद्भवू शकतात.