मुंबई – स्वतःच्या घराचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर आहे. ही खुशखबर कुण्या खासगी बँकेकडून नव्हे तर चक्क देशातील सर्वांत मोठी लोकांची बँक म्हणून नावलौकीक प्राप्त असलेली एसबीआय म्हणजे स्टेट बँक आफ इंडियाकडून आली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (एसबीआय) मिळणारे गृहकर्ज आता आणखी स्वस्त झाले आहे. बँकेने सोमवारी गृहकर्जावरील व्याजदरात असलेली सूट आणखी काही दिवस वाढविण्याची घोषणा केली आहे.
बँकेने गृह कर्जावरील व्याजदरात असलेली सूट ०.७० टक्क्यांपर्यंत वाढविली आहे. आता एसबीआयकडून कुणाला गृह कर्ज घ्यायचे असेल तर त्यांना केवळ ६.७० टक्के व्याजदर पडणार आहे. ही आफर ३१ मार्च पर्यंत लागू राहणार आहे. बँकेने स्वतःच या संदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे.
मुख्य म्हणजे एसबीआयतर्फे प्रोसेसिंग फीवरही शंभर टक्के सूट देण्यात आली आहे. आता फक्त कर्जाची रक्कम आणि कर्ज घेणाऱ्याचा सीबील स्कोअर यावर सारे काही अवलंबून आहे. भारतीय स्टेट बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे की वेळेत कर्ज फेडणाऱ्या ग्राहकांना उत्तम दरात कर्ज उपलब्ध करून देणे आमचे कर्तव्य आहे.
हाऊसिंग फायनान्स सेक्टरमध्ये एसबीआय मार्केट लीडर आहे, असे मानले जाते. त्याच पार्श्वभूमीवर ग्राहकांचे समाधान एसबीआयच्या अजेंड्यावर आहे. नव्या आफरमुळे ग्राहकांना बराच दिलासा मिळणार आहे. कारण कर्जाचा हफ्ताही कमी येईल आणि त्यांना कमीत कमीत व्याजदरात कर्ज उपलब्ध होईल.
७५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी ६.७० टक्के व्याजदर आणि त्यापेक्षा जास्त कर्ज हवे असेल तर ६.७५ टक्के व्याजदर असेल, असे बँकेने स्पष्ट केले आहे. Yono App च्या माध्यमातून ग्राहक घरबसल्या कर्जासाठी अर्ज दाखल करू शकतात. या एपच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज दाखल केल्यास व्याजात आणखी ०.०५ टक्के सुट मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिला कर्जदारांसाठी ५.०५ टक्क्यांची सुट दिली जात आहे.