नवी दिल्ली – आपल्या मुलांना पैशांचे महत्त्व कळावे, असे प्रत्येक पालकाला वाटते. मुलांना लहानपणापासूनच बचतीची सवय लागावी असा प्रयत्नही अनेक पालक करतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आता अशी एक विशेष योजना आणली आहे. लहान मुलांना समोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली आहे. एसबीआय पहिला कदम पहिली उडान (Pehla Kadam Pehli Udaan) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत एका वर्षाच्या मुलापासून दहा वर्षांपर्यंतच्या मुलांना वेगळी सुविधा देण्यात येत आहे. तर दहा वर्षांहून अधिक वयाच्या मुलांना वेगळी सुविधा दिली जात आहे. या योजनेची वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊयात.
पहिला कदम बचत खाता
या खात्यात आई-वडील किंवा पालक आपल्या मुलांच्या नावाने संयुक्त खाते उघडू शकतात. यामध्ये मुले या खात्याचे संचालन स्वतःसुद्धा करू शकतात. मोबाइल बँकिंग सुविधेसह या खात्यावर एटीएमही जारी केले जाईल. सध्याच्या गरजेनुसार सर्व प्रकारची बिले या कार्डद्वारे भरता येणार आहेत. खात्यातून दररोज पाच हजार रुपये काढू शकता येतील. खातेधारकांना अपघात झाल्यास पैशांची तरतूदही करण्यात आली आहे.
पहिली उडान बचत खाता
ज्या मुलांचे वय दहा वर्षांहून अधिक आहे, जे आपली सही करण्यास सक्षम आहेत. अशा सर्व मुलांना या योजनेत खाते उघडता येणार आहे. परंतु या योजनेसाठी वयाची मर्यादा १८ वर्षे ठरविण्यात आली आहे. १८ वर्षांहून अधिक वयाच्या मुलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या खात्यात एटीएमसोबत चेकबुकची सुविधा मिळेल. या खात्यात ५ हजार रुपये दररोज काढले जाऊ शकतात. तसेच दोन हजार रुपये दुसर्यांना पाठविण्याची मुभा आहे.