सायखेडा – मुलाचा विवाहसोहळा आटोपून घराकडे वऱ्हाडी मंडळींना घेऊन निघालेली पिकअप व्हॅन नांदूरमध्यमेश्वर गावाजवळ असणाऱ्या गोदावरी नदीपात्रावरील पुलावरून खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात २ जण ठार तर ८ जण जखमी झाले आहेत. सायखेडा पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
जळगाव नेऊर ता येवला येथील उत्तम घुले यांचा मुलगा योगेश याच्या विवाहासाठी सिन्नर येथे वऱ्हाडी गेले होते. विवाह सोहळा आटोपून ते निफाड सिन्नर मार्गाने गावाकडे निघाले होते. तेव्हा गोदावरी नदीवर पिकअप व्हॅन कोसळून ही दुर्दैवी घटना घडली.
नदीमध्ये पिकअप कोसळल्याने दिसताच या ठिकाणी मासेमारी करणाऱ्या विशाल मोरे याने नदीत उडी घेत यातील १५ लोकांना बाहेर काढले. त्याला रमजू शेख व सोमनाथ कुऱ्हाडे यांनीही मदत केली.सायखेडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या साहाय्याने पिकअप बाहेर काढली तोपर्यंत घटना स्थळी नांदूरमध्यमेश्वर येथील पोलीस पाटील गोरक्षनाथ वाघ ,खाणगाव येथील पोलीस पाटील दौंड ,विजय डांगले यांच्यासह ग्रामस्थांनी मदत कार्य केले. यातील जखमीना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
या दुर्दैवी घटनेत श्रीरामपूर येथील लग्नासाठी आलेली चिमुरडी सई विकास देवकर (वय ५), मधुकर घुले (५५) या दोघांचा मृत्यू झाला. सायखेडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या साहाय्याने पिकअप बाहेर काढली पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मध्ये अपघाताचा गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.