मुंबई – दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर आता त्यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानू यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करताच त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांना गेल्या तीन दिवसांपासून रक्तदाबाची समस्या जाणवत होती.
सायरा बानो या ७७ वर्षांच्या आहेत. त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. सायरा बानू यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या वृत्ताला एनआयए या वृत्तसंस्थेने दुजोरा दिला आहे. ही बातमी पसरताच चाहते त्यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन अद्याप आलेले नाही.
काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेते आणि त्यांचे पती दिलीप कुमार यांचे दीर्घ आजारानंतर ९८ व्या वर्षी निधन झाले होते. त्यानंतर सायरा बानू यांना धक्का बसला होता. बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री दुःखात बुडालेल्या सायरा बानू यांचे त्यांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले होते.