इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकची कन्या आणि हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री संयमी खेर यांनी नुकतीच स्वीडनमध्ये पार पडलेल्या ‘आयर्नमॅन ७०.३’ या कठीण स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा यश मिळवलं आहे. एवढंच नाही, तर गतवर्षीपेक्षा यावेळी ३२ मिनिटे कमी वेळेची नोंद त्यांनी केली आहे, म्हणजेच मागील वर्षापेक्षा अधिक वेगाने ही स्पर्धा पूर्ण केली आहे. त्याबद्दल तिचे मंत्री छगन भुजबळ यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
९० किमी सायकल चालवणे, १.९ किमी पोहणे आणि त्यानंतर सलग २१ किलोमीटर धावणे या गोष्टींचा अंतर्भाव असलेली ही स्पर्धा अतिशय अवघड समजली जाते. परंतु आपले अभिनयक्षेत्रातील काम सांभाळत आणि प्रसंगी कामातून पूर्ण ब्रेक घेऊन सरावासाठी अधिकचा वेळ देत त्यांनी हे यश साध्य केले.
त्यांची ही कामगिरी इतरांसाठी प्रेरणादायी असून याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक, तसेच आगामी काळातही असेच यश मिळवावे यासाठी खूप खूप शुभेच्छाही मंत्री भुजबळ यांनी दिल्या आहे.