येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मला कुठलीही तिळमात्र शंका नाही. मी शंभर टक्के निवडून येणार. आम्हाला धर्माधर्मात किंवा समाजासमाजात कुठलेही भांडण, तंटा नको आहे. फक्त विकास हवा आहे. जनतेला हे पटले आहे. आपल्याला सर्व एकसंध ठेवायचे आहे. मी आमदार होणार आणि पुन्हा मंत्रिमंडळात असणार. मतदानाच्या दिवशी तुम्ही अर्धा तास मला द्या, पुढची पाच वर्षे मी आपल्याला देणार आहे, असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. येथील शनी पटांगणावर झालेल्या सभेत ते बोलत होते.
येवला विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना शिंदे गट, आर.पी.आय आठवले गट, महायुती घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ येवला शहरातील शनी पटांगणावर भव्य जाहीर सभा पार पडली. यावेळी अफाट जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी अभिनेता सयाजी शिंदे, माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रचार प्रमुख तथा प्रदेश उपाध्यक्ष अंबादास खैरे, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, अरुणमामा थोरात, डी.के.जगताप, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,पंढरीनाथ थोरे, मायावती पगारे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, भोलाशेठ लोणारी, बंडू क्षीरसागर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, प्रमोद सस्कर, किशोर सोनवणे, भाऊ लहरे,धनंजय कुलकर्णी,आनंद शिंदे, संजय पगारे, गणपत कांदळकर, राजाभाऊ लोणारी,दिपक लोणारी, राजश्री पहिलवान, दत्ता निकम, विनायक भोरकडे,मच्छिंद्र थोरात, मकरंद सोनवणे, सुभाष पाटोळे,अशोक संकेलचा, अमजद शेख, मलिक मेंबर, डॉ.प्रवीण बुल्हे, देविदास निकम, राजेश भांडगे, मलिक मेंबर, सुभाष गांगुर्डे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, नितीन गायकवाड, गोटू मांजरे, विकी बिवाल, यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, माझं आणि तुमचं नातं आहे. माझ्यावर संकट आले त्यावेळी येवलेकर धावून आले. तुमच्यावर संकट आले तेव्हा मी धावून येतो. दीड-दोन महिन्यात येवला तालुक्यातील सर्व महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे. येवला शहराला दररोज पाणी पुरवठा होईल, हा माझा शब्द आहे. माझ्या महत्प्रयासाने मांजरपाड्याचे पाणी आले तेव्हा घागरीत पाणी आणून माझे पाय धुतले. किती नशिबवान आहे मी. चाळीस वर्षांचे डोळ्यातले स्वप्न पूर्ण होते आहे. दुष्काळी येवल्यातील शेतकरी आता बागायतदार होत आहेत. पुढील पाच वर्षात येवल्यामध्ये एकही जण झोपडपट्टीत राहणार नाही. मी आल्यापासून येवल्यात कधी दंगा झाला नाही की भानगड. कुणाकडून कधीच वर्गणी मागत नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, २००४ मध्ये माणिकराव शिंदेंसह अनेक जण माझ्याकडे आले. येवला दुष्काळी आहे. तो संपवा आणि विकास करा, यासाठी त्यांनी आग्रह केला. मी तयार झालो. त्यानंतर २००४ मध्ये येवल्याचा आमदार झालो. तेव्हापासून सलग चार वेळा मला पण सर्वांनी भरभरुन मते दिली. माणिकराव शिंदे हे राष्ट्रवादीतून सहा वर्षे हकालपट्टी केलेले आहेत.ते साधे पक्षाचे सदस्यही नाहीत. बाप लेकाला पोरगी पहायला घेऊन गेला आणि स्वतःच बोहल्यावर चढला.
यावेळी अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले की, भुजबळ साहेब निवडूनच येणार आहेत. फक्त आपल्याला लीड वाढवायचा आहे. वृक्षांच्या कामासाठी मी मंत्रालयात गेलो होतो. तेथे अजित पवार साहेब भेटले. त्यांनी माझ्याकडून माहिती घेतली आणि तत्काळ सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढले. त्यानंतर महाराष्ट्रात ४० ठिकाणी देवराई उभ्या राहिल्या. वृक्ष हे आपली आई आहेत. माझ्या आईसाठी मी बीज तुला केली होती. त्या बिया मला राज्यात सर्वत्र लावायच्या होत्या. नंतर अजितदादांचा आणि माझा संपर्क वाढत गेला. त्यांचे विकासाचे व्हिजन आहे. नंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो. मी राष्ट्रवादीच्या आमदारांचा आणि विकासाचा अभ्यास केला. येवला म्हणजे पैठणी आणि येवला म्हणजे भुजबळ साहेब. पत्नी बरोबर मी पैठणी घेण्यासाठी येवल्यात आलो होतो. भुजबळ साहेबांनी लक्ष घातले आणि जगभर पैठणी पोहचली. गेल्या महिन्यात येवल्यामध्ये आलो. सर्व प्रकल्प पाहिले आणि अचंबित झालो. ३८ गाव पाणी पुरवठा योजना पाहिली. दुष्काळी येवला जलसमृद्ध झाला. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला. मुक्तीभूमी, पैठणी केंद्र, शिवसृष्टी हे सारे व्हिजनरी नेताच करु शकतो. भुजबळ साहेब विजयी होणारच आहेत यात काही शंका नाही. १६० किलोमीटरवर मतदारसंघासाठी पाणी आणणे हे अशक्यच. ते भुजबळ साहेबांनी मांजरपाड्याद्वारे करुन दाखविले. येवल्यात झाडे लावायची आहेत. मी येणार आहे. येवला हिरवागार करायचा आहे. भुजबळ साहेबांना जेवढे लीड द्याल तेवढी झाडे लावू, अशी ग्वाही मी देतो.
डायलॉग म्हटले
यावेळी उपस्थित जनतेने अभिनेता सयाजी शिंदे यांना चित्रपट डायलॉग म्हणण्याची विनंती केली. शिंदे यांनी तेलगु चित्रपटातील डायलॉग म्हणून उपस्थितांची दाद मिळवली. शेतकऱ्यांच्या कार्यासंदर्भातील हा डायलॉग म्हटल्यानंतर जनतेने शिट्टी वाजवून दाद दिली. विकासाच्या मुद्याला उत्तर देता येत नसल्याने विरोधकांकडून जातीच्या राजकारणाचा आधार घेऊन वातवरण बिघडविन्याचे काम करत आहे.त्यामुळे या राजकारणाला बळी न पडता मंत्री छगन भुजबळ यांच्या विकासाला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ यांनी संपूर्ण मतदारसंघात एक नंबरची विकास कामे केली आहे. महाराष्ट्रासह देशभरासाठी त्यांची कामे रोड मॉडेल ठरली असून मंत्री छगन भुजबळ हे एक नंबरच्या मतांनी निवडून येतील असा विश्वास प्रचार प्रमुख अंबादास बनकर यांनी व्यक्त केले.
शासनाच्या सर्व योजनांचा लाभ हा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्याचे काम मंत्री छगन भुजबळ यांनी केल आहे. मांजरपाडा सारखा प्रकल्प मार्गी लावल्याने येवल्याला जलसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे त्यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून देऊ असा विश्वास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे व्यक्त केले.
गेल्या वीस वर्षांत मतदारसंघात अनेक विकासाची कामे मंत्री छगन भुजबळ यांनी करत सर्व समाजघटकांना न्याय दिला. मुस्लीम समाजाच्या विकासाठी त्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे संपूर्ण मुस्लीम समाज त्यांच्या सोबत असल्याचे माजी नगराध्यक्ष हुसेन शेख यांनी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ यांनी दुष्काळी येवला तालुक्याला जलसंजीवनी दिली. पिण्याच्या पाण्यासोबतच शेतकऱ्यांना जलसिंचनाच्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या. शिवसृष्टीसारखा भव्य दिव्य प्रकल्प उभा केला आहे. येवल्याच्या विकासाठी त्यांना प्रचंड मतांनी आपल्याला निवडून द्यायचे आहे असे आवाहन येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी केले.
मंत्री छगन भुजबळ हे या मतदारसंघाचे भाग्यविधाते आहे. त्यामुळे आमचा निर्णय हा पक्का झाला असून त्यांना एक लाखांहून अधिक मताधिक्य देऊन निवडून देऊ असे मोहन शेलार यांनी सांगितले.