इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सयाजी शिंदे हे गेल्या काही वर्षापासून सामाजिक कामात राज्यभर फिरत होते. त्यावेळी त्यांनी कधीही राजकारणात प्रवेश करेल असे सांगितले नाही. पण, आज अचानक त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले.
या प्रवेश सोहळ्यानंतर अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांचं मनापासून स्वागत करतो असे सांगत मनोरंजन सृष्टीसह सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांनी बजावलेली भूमिका अतुलनीय आहे. त्यांच्या प्रवेशानं पक्षाला अधिक बळकटी येईल तसंच जनकल्याणाच्या कार्यात त्यांचं मोलाचं योगदान लाभेल, असा विश्वास मला आहे. पुढील राजकिय कारकिर्दीसाठी त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!
यावेळी सयाजी शिंदे म्हणाले की, मला राष्ट्रवादीचे विचार आणि स्ट्रॅटेजी आवडल्या. त्यामुळे मी या पक्षात आलो. शेतकऱ्यांची कला ही सर्वोत्तम कला आहे. लाडकी बहीणचा जो निर्णय आहे, तो सर्वोत्तम निर्णय आहे. गावातील हातातोंडावर पोट असलेल्यांचं समाधान पाहिलं तर वाटलं यांचे निर्णय चांगले आहेत. एका पॉइंटलवा वाटलं आता काही हटत नाही, जे व्हायचं ते होऊ द्या”, असं सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केलं. मी त्यांच्याकडून राजकारण शिकेन. राजकारणाचे धडे घेईन. माझ्या डोक्यात जी कामे आहेत, ती पुढच्या पाच वर्षात करणार आहे. मला काही स्वार्थ नाही. माझ्या आयुष्यात सर्वकाही झालं आहे. ५०० ते ६०० सिनेमे केले. जगात नाव आहे. मला काही नको. पण मला पर्यावरणावर काम करायचं आहे. मला झाडं लावणारे, तज्ज्ञांचा चेहरा व्हायचं आहे.