नाशिक – लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या एका ४० वर्षीय महिलेवर नाशिकच्या सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे बेरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली. रूग्णालयातील बेरिअॅट्रिक व मेटाबोलिक सर्जरी विभागामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या या पहिल्या रूग्ण आहेत. अशी माहिती सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सहाय्यक उपाध्यक्ष संजय चावला यांनी दिली. ही शस्त्रक्रिया भारतातील बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेचे प्रणेते समजले जाणार्या प्रसिध्द बेरिअॅट्रिक सर्जन डॉ.संजय बोरूडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. २००० सालापासून या क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ.संजय बोरूडे यांनी आजवर तब्बल ७००० बेरिअॅट्रिक प्रक्रिया केल्या असून शस्त्रक्रियेसाठी त्यांना त्यांचे पुत्र डॉ.राहुल बोरूडे यांनी सहकार्य केले.
या ४० वर्षीय महिला रूग्णाची उंची १३९ सेमी इतकी असून, वजन मात्र ८५ किलो आणि बीएमआय ४४ इतका होता. त्यांना दुसरा कुठलाही आजार नव्हता . मात्र व्यवसायाने शिक्षिका असल्याने आणि सतत १० वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सानिध्यात असल्यामुळे वर्ग हाताळण्यासाठी उत्साही व सतत पायावर उभे राहणे आवश्यक आहे.वजन जास्त असल्यामुळे त्यांच्या प्राथमिक तक्रारी पाठ व गुडघेदुखी,उत्साहाचा अभाव आणि घोरणे हे होते.
डॉ.संजय बोरूडे म्हणाले की, बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेसाठी पात्र रूग्णांचे वजन सहसा तीन आकड्यांमध्ये असते आणि त्यांना लठ्ठपणाशी संबंधित गुंतागुंती असू शकतात. मात्र हळूहळू बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेचे महत्त्व वाढले असून याची ओळख आता मेटाबोलिक शस्त्रक्रिया अशी होत आहे. याचा प्राथमिक फायदा याच्या नावातच आहे. बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेच्या अतिरिक्त फायद्यांबाबत अजूनही पुरेशी जागरूकता नाही. ते पुढे म्हणाले की,लठ्ठपणा विशेष करून पोटाचा घेर ही समस्या भारतात लक्षणीयरित्या वाढत चालली आहे.जीवनशैलीत बदल,चुकीच्या खाण्याच्या सवयी,झोपेचा व व्यायामाचा अभाव यासाठी कारणीभूत ठरत आहे.
लठ्ठपणा हा अनेक आजारांसाठी जोखमीचा घटक आहे,हे सर्वज्ञात आहे.बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेमुळे लठ्ठपणा असलेल्या मधुमेहींना फायदा होऊ शकतो,कर्करोगाची जोखीम कमी होऊ शकते,सांधेदुखी कमी होऊ शकते आणि इतर अनेक स्थितींमध्ये सुधार होऊ शकतो.वजन घटविल्यावर जीवनमानामध्ये लक्षणीयरित्या सुधार होऊ शकतो,त्याचबरोबर आत्मविश्वास वाढविण्यास आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. या रूग्णास कुठल्याही सहव्याधी नाहीत,परंतु त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना सतत उभे राहणे आणि सक्रीय असणे गरजेचे आहे. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांतच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शल्यविशारद आणि त्यांच्या टीमचा सल्ला घेऊन ते काही दिवसातच आपले दैनंदिन कामकाज सुरू करतील.अद्ययावत शल्यचिकित्सा सुविधा आणि प्रशिक्षित टीममुळे लवकर डिस्चार्ज देण्यात मदत झाली.
महाराष्ट्रातील आघाडीची साखळी रूग्णालय म्हणून उत्तर महाराष्ट्रात सह्याद्रि हॉस्पिटल्सला ओळखले जाते, सर्व व्ह्यधींवरील नियमित उपचारांसोबत अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील येथे यशस्वीरीत्या पार पडल्या जातात. रूग्णांसाठी सतत नवनवीन तंत्रज्ञान आणि सेवा आणण्यात नेहमी आग्रही असतो. बेरिअॅट्रिक आणि मेटाबोलिक शस्त्रक्रिया विभाग आमच्या अद्ययावत सुविधांमध्ये नवीनतम जोड आहे. भारतातील बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेमध्ये आघाडीचे तज्ञ म्हणून ओळख असलेले डॉ.संजय बोरूडे यांच्याशी जोडले जाणे आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.एकीकडे भारतात सर्व वयोगटांत लठ्ठपणाची समस्या वाढत असताना याबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे,कारण लठ्ठपणा हा अनेक दीर्घकालीन आजारांसाठी जोखमीचा घटक ठरू शकतो असेही सह्याद्रि हॉस्पिटल्स नाशिकचे सहाय्यक उपाध्यक्ष डॉ.संजय चावला यांनी नमूद केले. तसेच सह्याद्रि हॉस्पिटल तर्फे लवकरच बेरिअॅट्रिक व मेटाबोलिक सर्जरीचे विशेष सेंटर सुरु करण्यात येणार असून तेथे मुंबईतील नामवंत तज्ञ महिन्यातून दोनदा उपस्थित राहतील.