सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संत शिरोमणी सावता महाराज यांची पावनभूमी श्रीक्षेत्र अरणला देशात महत्त्व आहे. या तीर्थक्षेत्र विकासासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाला दिल्या आहेत. या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून ‘ब’ दर्जाच्या तीर्थक्षेत्राला ‘अ’ दर्जा देण्याचा निर्णय घेऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली.
अरण ता. माढा येथे सावता परिषदेत श्री. पवार बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, सर्वश्री आमदार बबनराव शिंदे, शहाजी पाटील, संजय शिंदे, यशवंत माने, सतीश चव्हाण, माजी आमदार दीपक साळुंखे, उद्योजक शंकरराव बोरकर, सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे, सावता महाराज यांचे वंशज रमेश महाराज वसेकर, माजी समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे आदिसह मान्यवर उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, श्रीक्षेत्र अरणच्या विकासासाठी लागणारी जमीन संपादित करण्यात येईल. सावता महाराज समाधी, अरण ते आष्टी पालखी मार्ग या कामासाठी निधी कमी पडणार नाही. श्री क्षेत्र अरणच्या विकासासाठी अपेक्षांची पूर्तता शासन करेल. समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी समाज सुधारकांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आपले काम हेच पूजा ही सावता महाराजांची शिकवण आणि त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने हे सरकार काम करीत आहे. त्यांचे विचार आणि संस्कार यावर पुढचा मार्ग निवडूया.
समता आणि समानता यांची शिकवण देणारे सावता महाराज समाजाचे दिशादर्शक होते. सावता परिषदेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मांडण्याचे काम होत आहे. वंचित, दुर्लक्षित वर्गाला इतरांबरोबर आणण्यासाठी हे शासन प्रयत्न करीत आहे. राज्यातील सर्व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.
राजकारणातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत एम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. निवृत्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती करीत आहे. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा घटनेने अधिकार दिला आहे. यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही श्री पवार यांनी सांगितले.
नागरिकांनो उष्णतेपासून सावधान
सध्या तापमान खूप वाढत आहे. उष्णतेची लाट आणखी चार-पाच दिवस असल्याने नागरिकांनी उन्हात घराबाहेर पडू नये. लहान मुले, वृद्ध यांची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने पाणी भरपूर प्यावे. अजूनही कोरोनाचे संकट संपलेले नाही, प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
श्री.मुंडे म्हणाले, श्रीक्षेत्र अरण येथे दरवर्षी सावता परिषद व्हावी. हे तीर्थक्षेत्र ब दर्जाचे अ दर्जाचे करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेऊ. हे तीर्थक्षेत्र देशातील सर्वश्रेष्ठ करण्याचा प्रयत्न केला जाईल. पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी संत शिरोमणी सावता महाराजांच्या भेटीला अरण याठिकाणी येत असल्याने या ठिकाणाला खूप महत्व आहे.
पालकमंत्री श्री. भरणे म्हणाले, सावता महाराज आणि श्रीक्षेत्र अरण यांच्या विकासाला शासन सर्वोच्च प्राधान्य देईल. हे तीर्थक्षेत्र उपेक्षित राहणार नाही. इतर तीर्थक्षेत्रासारखा विकास करण्याचा शासन प्रयत्न करेल.
श्रीमती चाकणकर म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची कवाडे उघडली. यामुळेच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करीत आहेत. प्रत्येकाने नोकरीच्या मागे न लागता स्वयम् रोजगारातून उभे रहावे. या सावता परिषदेतून महात्मा फुले यांच्या समतेचा संदेश महाराष्ट्रात घेऊन जाऊया.
यावेळी आमदार शहाजी पाटील यांनी विचार व्यक्त केले.