मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
२०२१-२२ या आर्थिक वर्षात कर वाचवण्याची ३१ मार्च २०२२ ही अंतिम मुदत आहे. कर वाचवण्यासाठी जर तुम्ही प्राप्तीकर कलम ८० सी चा फायदा घेऊन एका लाख ५० हजार रुपयांपर्यंतचा कमाल कर वाचवू शकले असले, तरी तुम्ही दुसऱ्या कायदेशीर पद्धतीने प्राप्तीकर वाचवू शकतात. त्यासाठी तुम्हाला प्राप्तीकराच्या कलम ८० डी चा वापर करावा लागणार आहे. त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त एक लाख रुपयांचा कर वाचवू शकतात. त्याबद्दल जाणून घेऊया.
प्राप्तीकराच्या कलम ८० डी मध्ये आरोग्य विम्याचा प्लॅन निवडल्यावर प्रीमियमवर अतिरिक्त कर फायदा मिळतो. या कलमानुसार, तुम्ही आई-वडील यांच्यासह संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर कर वाचवू शकतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ६० वर्षांहून कमी वयाच्या नागरिकांना आरोग्य विमा प्रीमियमवर २५ हजार रुपयांपर्यंत कर वाचवण्याचा फायदा मिळतो. तर ६० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना ५० हजार रुपयांपर्यंतचा कर वाचवता येतो. जर तुमचे वय ६० हून कमी आणि आई-वडिलांचे वय ६० पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला ७५ हजार रुपयांपर्यंतचा कर वाचण्याचा फायदा मिळू शकतो. त्याशिवाय जर करदात्याचे वय ६० पेक्षा जास्त असेल आणि तो स्वतः आपल्या आई-वडिलांचा आरोग्य विमा खरेदी करत असेल, तर त्याच्या प्रीमियमवर १ लाख रुपयांपर्यंतचा कर वाचवला जाऊ शकतो. प्राप्तीकर कलम ८० डी अंतर्गत तुम्ही वैयक्तिक प्लान किंवा मेडिक्लेम, फॅमिली फ्लोटर प्लान, क्रिटिकल इलनेस प्लान, लाइफ इन्शुरन्स प्लानच्या हेल्थ रायडर्स आणि हेल्थ इंशुरन्सच्या इतर प्रकारांमध्ये आरोग्य विम्यावर कर वाचवण्याचा फायदा घेऊ शकतात.