प्रा. फडके, डॉ. जाधव, प्रा. कुटेंचा विजय
हा वाचनसंस्कृतीचा सन्मानच
– प्रियदर्शन टांकसाळे (ज्येष्ठ पत्रकार. मो. 8007007854)
सार्वजनिक वाचनालय,नाशिक(सावाना)च्या निवडणुकीत विजयी झालेले ग्रंथालय भूषण पॅनेलने अध्यक्षपदाचे उमेदवार प्रा.दिलीप फडके तसेच उपाध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. विक्रांत जाधव आणि प्रा.सुनील कुटे हे उच्चशिक्षित आहेत. त्यांना वाचनाची गोडी असून आणि वाचनालयाचा गाडा समर्थपणे हाकण्याची त्यांच्यात क्षमता आहे.आणि म्हणूनच सुज्ञ मतदारांनी त्यांच्यात बाजूनेच कौल देऊन एकप्रकारे त्यांचा सन्मानच वाढविला आहे,असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
अध्यक्षपदी विजयी झालेले प्रा.दिलीप फडके हे एम.कॉम, डीबीएम,एमएमएस असून नामांकित बीवायके आणि नाशिकरोड महाविद्यालयात त्यांनी चार दशके अध्यापनाचे काम केले आहे.याच काळात तीस पाठ्यपुस्तकांचे लेखन करून आपल्या विद्वतेची चुणूक त्यांनी दाखविली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनेक पदांवर त्यांनी काम केले आहे.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात मानद संचालक म्हणूनही ते कार्यरत होते.अ.भा.ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहक संरक्षण क्षेत्रात गेल्या 37 वर्षांपासून ते उल्लेखनीय कार्य करीत आहेत.प्रदेशाध्यक्ष, अ.भा.संघटनमंत्री आदी पदांवर त्यांनी अनेक वर्षे कार्य केले.ग्राहक कल्याण नवनीत या महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या मासिकांच्या मालिकेच्या मुख्य संपादकाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. ग्राहक संरक्षण विषयावर अनेक टीव्ही मालिकांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले आहे.बिल्डर्स आणि ग्राहक यांच्यातले वादविवाद संवाद आणि चर्चेने सुटावेत यासाठी महाराष्ट्रस्तरावर संपदा नियामक प्राधिकरणाने(महारेरा) स्थापन केलेल्या सलोखा मंचावर ग्राहक प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी महत्वाची भूमिकाही बजावली आहे.
नाशकातील नाएसो या नामांकित शैक्षणिक संस्थेचे ते विद्यमान उपाध्यक्ष आहेत.उंटवाडीशाळा,रंगुबाई जुन्नरे स्कूल या नामांकित शाळेचे अध्यक्ष म्हणूनही ते काम बघत आहेत.कोरोनाच्या काळात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच दुर्दैवाने कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांचे छत्र हरपले त्यांना सहाय्य करण्यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सावानाचा शिक्षक गौरव,लायन्स क्लबचा पुरुषसिंह आदी अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे.गेल्या 5 दशकांपासून गांवकरी, देशदूत, सकाळ, लोकमत,महाराष्ट्र टाइम्स,लोकसत्ता आदी नामांकित दैनिकांत अनेक विषयांवर हजारांवर लेख त्यांनी लिहिले आहेत. इंडिया दर्पण लाईव्हमध्येही त्यांनी वलयांकित ही लेखमाला लिहिली. चित्पावन ब्राह्मण संघ या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे.सद्या संस्थेचे ते विद्यमान विश्वस्तही आहेत. परशुराम नागरी पतसंस्थेचे संस्थापक संचालक तसेच महाविद्यालयीन शिक्षक संघटना आणि महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
उपाध्यक्षपदी निवडून आलेले पाहिले उमेदवार डॉ.विक्रांत जाधव हे आंतरराष्ट्रीय आयुर्वेद चिकित्सक आहेत.ते आयुर्वेदाचार्य असून कोटक्कल (केरळ)आणी मणीबेन रुग्णालय(अहमदाबाद) येथे गुरुपरंपरेने त्यांचे आयुर्वेद शिक्षण झाले.नाशकातील सुशीला आयुर्वेद संशोधन केंद्र व पंचकर्म रुग्णालय व चिकित्सालयचे ते कार्यकारी संचालक आहेत.भारतातील पहिल्या आयुर्वेद वेबसाईटचेही ते निर्माते आहेत.सुशीला चिकित्सालयाची मुख्य शाखा नाशिकला असून मुंबई,पुणे व अमेरिका येथेही त्यांच्या शाखा आहेत.विक्रांत जाधव हे 4 अंतरराष्ट्रीय कारखान्यांना औषध निर्मितीसाठी सल्लागार म्हणून सहकार्य करतात.बॉडी शॉप आणि मसकॅतचे ते माजी सल्लागार आहेत.इवोरी आंतरराष्ट्रीयचे ते सल्लागार आहेत. दुबईत वातनाडी विकारांवर दोन वर्षे सल्लागार म्हणूही त्यांनी काम केले आहे.शुद्ध आयुर्वेद चिकित्सेचा त्यांना 30 वर्षांचा अनुभव असून आयुर्वेदाच्या उपचारासाठी लांबलांबून लोक त्यांच्याकडे येतात यावरून त्यांच्या हातांना किती गुण आहेत याची खात्री पटते.
वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आतापर्यंत आयुर्वेद भूषण,वनौषधी,किर्लोस्कर,दिव्य मराठी,राज्यस्तरीय कोविड योद्धा आदी पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे. त्यांचे 5500 हून अधिक आयुर्वेद विषयक लेख महाराष्ट्र व गोवा येथील विविध दैनिकांत प्रसिद्ध झाले आहेत. 450 विविध वनौषधी वनस्पतींवरही त्यानी लिखाण केले आहे.त्यांच्या 14 पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे.त्यांचे 16 संस्कारावरील 200 पानी ‘संस्कार’पुस्तक प्रकाशनाच्या उंबरठ्यावर आहे.
राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय स्तरांवर त्यांचे 48 शोध निबंध सादर झाले आहेत.महाराष्ट्रातील पहिल्या आयुर्वेद प्रदर्शनाचे संयोजक म्हणून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.आतापर्यंत 48 टी.व्ही शोमध्ये त्यांना चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले हा त्यांच्या कार्याचा हा एकप्रकारे गौरवच म्हणावसं लागेल.देश तसेच परदेशात त्यांनी आयुर्वेद विषयावर 170 हून अधिक व्याख्याने दिली आहेत.लॉयन्स क्लबचे प्रांतपाल म्हणूनही त्यांनी धुरा सांभाळली आहे.आयुर्वेदाच्या साह्याने सुरगाणा तालुका कोविडमुक्त करण्याचे श्रेय डॉ.विक्रांत जाधव यांना जाते.
उपाध्यक्षपदी विजयी झाले ग्रंथालायभूषण पॅनलचे दुसरे उमेदवार डॉ.प्रा.सुनील कुटे हे अभियंता असून नाशकातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात ते गेल्या 35 वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत आहेत.विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे साहित्य,वाचन,कला व लिखाण या क्षेत्रात त्यांना विशेष रुची आहे.
आतापर्यंत त्यांचे विविध दैनिकांत दीडशेहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.सामाजिक व राजकीय लिखाणाबाबत दैनिक लोकमततर्फे दिला जाणारा पां.वा.गाडगीळ हा मानाचा पुरस्कार डॉ.कुटे यांना तीनवेळा मिळाला आहे.अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा आत्तापर्यंत दहाहून अधिक विविध पुरस्कारांनी सन्मान झाला आहे.110हून अधिक शोधनिबंध त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केले आहेत.वाचन,संस्कृती आणि सामाजिक विषयावर आतापर्यंत त्यांनी शेकडो प्रबोधनपर व्याख्याने दिली आहेत.त्यांना वाचनाची इतकी आवड आहे कीअजूनही दररोज ते एक पुस्तक वाचून हातावेगळे करतात.ग्रंथालय समृद्धीसाठी त्यांच्याकडे कृतिशील योजनांचा आराखडा आहे.सावानाच्या विविध समित्यांच्या माध्यमातून त्यांनी संस्थेच्या विकासात भरीव योगदान दिले आहे.