नाशिक- १८१ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या व जिल्ह्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यविषयक चळवळीत मोलाची भूमिका बजाविणाऱ्या सार्वजनिक वाचनालय,नाशिक(सावाना)च्या २०२२ ते २०२७ साठीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रा.दिलीप फडके यांच्या नेतृत्वाखालील ग्रंथालायभूषण पॅनल स्थापन करण्यात आले असून त्यात जुन्या आणि नव्या उमेदवारांचा संगम असल्याचे पॅनलच्या पाठीशीच सभासद खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास पॅनलच्या नेत्यांनी व्यक्त केला.
पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी प्रा.दिलीप फडके तर उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी डॉ.विक्रांत जाधव आणि प्रा. डॉ. सुनील कुटे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कार्यकारी मंडळाच्या १५ जागांसाठीही उमेदवारी अर्ज दाखल झाले असून त्यात सर्व क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. रविवार कारांजवरील सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन या सर्वांनी एकत्रितरित्या अर्ज दाखल केले व सावानाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रंथालयभूषण पॅनलच्या नेत्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास प्रारंभ केला असून या पॅनलच्या प्रचाराचा नारळ गुरुवारी दुपारी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते विनायक नयनतारा सिटीवन,ऋग्वेद मंगल कार्यालयाजवळ, तिडके अनेक्स येथे फोडण्यात येणार आहे. वाचन संस्कृती वाढविण्याबरोबरच वाचनालायला लाभलेला उच्चकोटीचा वारसा जतन करण्यासाठी आम्ही सारे नेटाने प्रयत्न करू आणि सभासद आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास पॅनलचे नेते डॉ.दिलीप फडके यांनी व्यक्त केला.