नाशिक – सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता अध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ ग्रंथविक्रेते वसंत खैरनार तर उपाध्यक्ष पदाकरिता ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक प्रा. दिलीप धोंडगे व सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री प्रा. मानसी देशमुख यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. येत्या ८ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी सौ. योगिनी जोशी यांचेकडे सदर अर्ज दाखल करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार श्रीकांत बेणी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण होत असलेल्या पॅनलमध्ये हे उमेदवार आहेत.
अध्यक्ष पदाचे उमेदवार वसंत खैरनार ज्योती स्टोअर्सच्या माध्यमातून गेल्या ५० वर्षांपासून ग्रंथ व वाचन संस्कृतीशी जोडले गेले आहेत. गेली २२ वर्षे लेखक तुमच्या भेटीला हा उपक्रम दरवर्षी ते राबवितात आणि या माध्यमातून मान्यवर लेखकांचे विचार वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ते करतात. खैरनार यांनी आजवर चैतन्य यात्री हे पुस्तक लिहिले असून १५ विविध पुस्तके प्रकाशित केली आहेत. उपाध्यक्ष पदाचे उमेदवार प्रा. दिलीप धोंडगे सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानदेव अध्यासनाचे प्रमुख म्हणून काम करीत आहेत. शिक्षण क्षेत्रात गेल्या ४४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या प्रा. धोंडगे यांची आजवर १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक या नात्याने ते सर्वत्र ख्यातकीर्त आहेत.
उपाध्यक्ष पदाच्या दुसऱ्या उमेदवार प्रा. मानसी देशमुख या दांडेकर टेक्निकल इन्स्टिट्यूट या समाजातील गरजू व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असे व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या प्राचार्य म्हणून गेली १३ वर्षे कार्यरत आहेत. नाशिक व्यवसाय विद्या प्रसारक मंडळाच्या त्या सेक्रेटरी आहेत. त्यांची ५ पुस्तके प्रकाशित झाली असून उत्तम लेखिका व कवयित्री म्हणून त्या ख्यातकीर्त आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना पॅनलचे कार्यकारी मंडळ सदस्य पदाचे उमेदवार श्रीकांत बेणी, प्रा. शंकर बोऱ्हाडे, ऍड भानुदास शौचे, योगाचार्य अशोक पाटील, हेमंत देवरे तसेच विनोद राठोड सावानाचे व्यवस्थापक दिलीप बोरसे उपस्थित होते.