नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेची सन २०२२ ते २०२७ या कार्यकाळाकरिता पंचवार्षिक निवडणूक माहे मे २०२२ च्या पहिल्या आठवड्यात संपन्न होणार आहे. ७ मार्च २०२२ पर्यंतच्या आजीव आणि मासिक सभासदांची यादी सार्वजनिक वाचनालय टिळकपथ, नाशिक आणि स्व. गो. ह. देशपांडे उद्यान वाचनालय, आकाशवाणी केंद्रासमोर गंगापूर रोड नाशिक येथे लावण्यात आली आहे. संस्थेच्या घटनेप्रमाणे ३१ मार्च पर्यंत झालेले आजीवन, वर्गांतरित व थकबाकी वर्गणी भरणारे सर्वसाधारण सभासद हे निवडणूक प्रक्रियेसाठी पात्र असणार आहे.
सावानाचे अध्यक्ष नानासाहेब बोरस्ते यांनी सभासदांना आवाहन केले आहे. सभासदांनी वाचनालयास भेट देऊन यादीतील आपले नांव, पत्ता बरोबर आहे की नाही याची खातरजमा करावी. त्यामध्ये काही बदल करावयाचा असल्यास या संदर्भात व्यवस्थापकांकडे लेखी पत्र द्यावे, आपल्या कुटुंबियांपैकी अथवा परिचितांपैकी कुणा व्यक्तीचे निधन झाले असल्यास त्याबाबतची लेखी माहिती सावाना व्यवस्थापकांकडे द्यावी ही विनंती. आपले स्मार्ट कार्ड घेतले नसल्यास सावाना पुस्तक देवघेव विभागाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
प्रारूप यादी १ एप्रिलला प्रसिध्द होणार
सार्वजनिक वाचनालयाच्या १३ मार्च,२०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी दिलेले निर्देश व ठरावानुसार कामकाज होईल. त्यानुसार संस्थेच्या घटनेप्रमाणे .३१ मार्च,२०२२ पर्यंत झालेले आजीवन, वर्गांतरित व थकबाकी वर्गणी भरणारे सर्वसाधारण सभासद हे निवडणूक प्रक्रियेसाठी पात्र असतील तसेच १६ मार्च,२०२२ पर्यंत प्रारूप यादीवर मागविलेल्या हरकतींची मुदत .७ एप्रिल,२०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच ३१ मार्च,२०२२ पर्यंत झालेल्या सभासदांची प्रारूप यादी १ एप्रिल,२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या यादीवर दि.७ एप्रिल,२०२२ पर्यंत आपल्या हरकती नोंदविता येतील तसेच दि. ८ एप्रिल,२०२२ रोजी सकाळी ११.३० वा. सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर दि.९ एप्रिल,२०२२ रोजी अंतिम यादी प्रसिध्द होईल असे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, सहा.सचिव प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी कळविले आहे. याबाबत बोलतांना अध्यक्ष नानासाहेब बोरस्ते म्हणाले सर्वसाधारण सभा ही सर्वोच्च सभा असून या सभेतील निर्णयाची अंमलबजावणी करणे घटनात्मक कर्तव्य आहे. याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश अध्यक्ष नानासाहेब बोरस्ते यांनी दिले असल्याचे प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी कळविले आहे.