नाशिक: सार्वजनिक वाचनालयला १८१ वर्षांची परंपरा आहे. आज वाचनालयाकडे पावणे दोन लाखांची ग्रंथसंपदा, ५० हजार संदर्भ ग्रंथ आणि १० हजार दुर्मिळ पोथ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे साहजिकच वाचनालयाच्या कारभाराकडे, निवडणूकीकडे सगळ्यांच लक्ष आहे. २००८ च्या पूर्वीपर्यंत सार्वजनिक वाचनालय अस नाव असलं तरी काही ठराविक ६-७ कुटुंबाच्या हातातील संस्था आहे की काय असं वातावरण होत. त्यातूनच त्यावेळी भारद्वाज – रहाळकर यांचा एक गट आणि रमेश जुन्नरे गट यांच्यात मतभिन्नता निर्माण झाली. आणि २००८ साली डॉ. वसंतराव पवार यांचा यात प्रवेश झाला. त्यांनी आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना आणलं. इथे चांगलं काम करण्याची संधी मिळाली आणि शासनाच्या नियमांची अंमलबजावणी व्हावी अशी भूमिका आम्ही घेतली. उपलब्ध असलेल्या सगळ्या ग्रंथसंपदेचा लाभ सगळ्यांना झाला पाहिजे आणि ही ग्रंथ चळवळ लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे मत ग्रंथमित्र पॅनलचे प्रमुख श्रीकांत बेणी यांनी व्यक्त केले.
इंडिया दर्पण फेसबुक लाइव्हमध्ये ते बोलत होते. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. प्रचाराविषयी आणि सभासदांच्या प्रतिसादाविषयी त्यांनी सांगितले की, सध्या आमचा भर हा प्रत्यक्ष सभासदांच्या गाठीभेटी घेऊन, त्यांच्याशी बोलून, आजपर्यंत केलेलं काम आणि भविष्यात जे करू इच्छितो त्याची तारीखवार माहिती देण्याकडे आहे. आमच्या पॅनलमध्ये ग्रंथचळवळ, वाचनाशी निगडीत प्रत्येक माणूस जोडला गेलेला आहे. आणि या निवडणुकीचे सभासद, मतदार हे इतर निवडणुकीपेक्षा भिन्न आहेत. हे सभासद सुज्ञ, अभ्यासू, उच्चविद्याविभूषित, प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणारा आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांचा इतिहास भूगोल माहिती असणारा आहे. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याआधी त्यांनी केलेल्या कामाविषयी बोलताना ते म्हणाले की, २०११ साली प्रमुख सचिव असताना आम्ही पुस्तक देवघेव विभागासाठी एक सॉफ्टवेअर घेतलं. त्यात सभासदांची नोंदणी, पुस्तकांची लेखकनिहाय नावं, बारकोडिंग या सुविधा आणल्या. जेणेकरून पुस्तकाचं नाव लगेच शोधता येईल, पुस्तक सभासदाकडे असेल तर ती माहिती मिळेल. पण त्यानंतर २०१२ साली कार्यकारी मंडळ बदललं आणि त्यांनी हे सॉफ्टवेअर काढून टाकल. २०१७ साली पुन्हा एकदा आम्ही आल्यानंतर ही संगणकीय यंत्रणा अपडेट केली. आणि सभासदांना त्याचा चांगला फायदा होत आहे. येणाऱ्या काळात ग्रंथसंपदा घरबसल्या बघता येईल अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत. लायब्ररी ऑन व्हील अशी सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहोत. शहरातील प्रमुख ठिकाणं निवडून त्या ठिकाणी सभासद नोंदणी करू शकतात, पुस्तक घेऊ शकतात, वर्गणी भरू शकतात. तसेच स्वीगी, झोमॅटो सारखे अप्लिकेशन आणण्याच्या विचारात आहोत. तंत्रज्ञानाच्या आधारे वाचन चळवळ विकसित कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
सावानाचे वाद, कोर्ट कचेऱ्या, भांडणे याविषयी त्यांनी परखडपणे मत मांडले. २०१७ ते २२ या आपल्या काळात काहीही गैरव्यवहार झाला नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. या आधीच्या कार्यकारी मंडळातील ऍड. अभिजित बगदे यांनी सूचना काढली होती की ५००० हजारच्या वर कामांसाठी टेंडर काढण्यात यावे. पण २०१३-१४ च्या काळात ६३ लाखांचे अग्निशमन यंत्रणा बसवण्याचे काम टेंडर न काढता करण्यात आले. तेव्हा कोणीही काही बोलले नाही. तसेच नाट्यगृह, प्रदर्शन हॉल यावरील सर्व्हिस टॅक्स भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने १० ते १२ लाखांचं काम ३१ लाखांमध्ये झालं. २०१५-१६ मध्ये नुतनीकरणाच काम नियमांची पायमल्ली करून करण्यात आले. विरोधी पक्षाच्या अशा अनेक बाबींवर त्यांनी ताशेरे ओढले.
तरुणांना वाचन चळवळीकडे आकर्षित करण्याबाबत ते म्हणाले की तंत्रज्ञानाला धरून काही बदल करणे अपेक्षित आहे. डिजिटल लायब्ररी हा उपक्रम आम्ही सुरू करणार आहोत. दुर्मिळ पोथ्यांचे डिजिटलायझेशन करून जगभरातील अभ्यासकांना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणार आहोत. पसा नाट्यगृहाविषयी ते म्हणाले की काही लोकांची मागणी आहे की पसा नाट्यगृहात एसी बसवावे पण दोन्ही बाजूने विचार व्हायला हवा. कालिदास आणि पसा मध्ये फरक आहे. कालिदासचे भाडे जास्त आहे पण पसाचे भाडे सर्वसाधारण व्यक्तीला परवडेल असे आहे. एसी बसवला तर भाडे आकारणी वाढेल त्यामुळे हा सगळ्यांना लक्षात घेऊन याविषयी चर्चा करून अंमलबजावणी करावी लागेल. थोडक्यात काय तर ग्रंथमित्र पॅनलची भूमिका प्रतिस्पर्धी पॅनलचे घोटाळे समोर ठेवून त्यांनी परखडपणे मांडली.