नाशिक – येत्या आठ मे रोजी संपन्न होणाऱ्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावाना या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीस स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सार्वजनिक वाचनालयाच्या विद्यमान कार्यकारी मंडळाची मुदत १२ एप्रिल २०२२ रोजी संपल्याने कार्यकारी मंडळाने अंतिम मतदार यादी घोषित करून निवडणूक अधिकारी नियुक्त केले होते. निवडणूक अधिकारी ज्येष्ठ विधिज्ञ शंकरराव सोनवणे यांनी निवडणूक कार्यक्रम देखील घोषित केला आणि त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाली दरम्यान मिलींद जहागिरदार विनया केळकर स्वानंद बेदरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सिव्हिल एप्लीकेशन दाखल करून निवडणुकीस स्थगिती देण्याची मागणी केली होती. या अर्जावर आज २ मे २०२२ रोजी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी झाली. मिलींद जहागिरदार यांच्यावतीने एड उदय वारुंजीकर यांनी युक्तिवाद केला. की विद्यमान कार्यकारी मंडळ हे डीफॅक्टो ट्रस्टी असल्याने त्यांना मतदार यादी जाहीर करण्याचा किंवा निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सुरु असणारी निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने एड प्रफुल्ल शहा यांनी युक्तिवाद केला की विद्यमान कार्यकारी मंडळाची मुदत संपल्याने घटनेनुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणातील अर्जदार जहागीरदार, केळकर, बेदरकर यांनी संस्थेचे आर्थिक गैरव्यवहार केल्याने त्यांचे सभासदत्व 2017 सालीच वार्षिक सर्वसाधारण सभेने रद्द केले आहे. त्यामुळे त्यांना स्थगिती मागण्याचा कोणताही अधिकार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेतील केवळ मतदान एवढेच प्रक्रिया बाकी आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत निवडणुकीला स्थगिती देता येणार नाही. न्या गडकरी यांनी प्रफुल्ल शाह यांचा युक्तिवाद मान्य करून निवडणूक प्रक्रिया स्थगिती देण्यास नकार दिला.
सावनाचे सभासद अतिशय सुज्ञ आहेत
घोटाळे करणारे हेच, त्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमणार हेच, समितीने आर्थिक गैरव्यवहार झाला असा अहवाल दिल्याने वार्षिक सभेत त्यांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी समर्थन देणारे हेच आणि आत्ता नियमानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असताना त्यात अडथळे आणण्यासाठी कोर्टकचेरी करणारे देखील हेच आहेत .आणि ते मात्र सावाना कोर्ट मुक्त करणार अशी भाषा करीत आहे.सावना चे सभासद अतिशय सुज्ञ आहेत ते त्यांचा समाचार बरोबर घेतील याचा आत्मविश्वास वाटतो.
श्रीकांत बेणी , कार्यकारी मंडळ सदस्य. सावाना नाशिक