नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या सेवा पर्व कालावधीत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणतर्फे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात महावितरण व प्रीत चॅरिटेबल संस्थेच्या सौजन्याने योजनेची थेट जागृती करण्यासाठी सौर प्रचार रथ तयार करण्यात आलेला आहे. “सोलरपे चर्चा” करीत मार्गक्रमण करणाऱ्या सूर्यघर योजनेच्या या सौर रथाला विद्युत भवन येथे नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी आज मंगळवार (दि. २३) रोजी हिरवी झेंडी दाखवीत जनजागृतीला प्रारंभ केला.
या रथाच्या उद्घाटन प्रसंगी नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता, राजेश थुल, सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे, उपमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, कार्यकारी अभियंते चेतन वाडे, जगदीश जाधव, अनिल झटकारे, नंदकिशोर काळे, व्यवस्थापक हेमंत भामरे, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, सहाय्यक विधी अधिकारी रणजीत बोम्मी तसेच प्रीत चॅरिटेबल संस्थेचे डॉ. शरद बोडके, शशिकांत बोडके यांचेसह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
” प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत महावितरणच्या नाशिक परिमंडळातील २५ हजार ३४३ ग्राहकांनी लाभ घेत आपल्या छतावर ५८.२५ मेगावॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसविली आहे. सेवापर्वात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणतर्फे विशेष अभियान राबविण्यात येत असून या योजनेचा वीज ग्राहकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.”
यामध्ये नाशिक मंडळात एकूण १४ हजार ५४५ ग्राहक, मालेगाव मंडळात १ हजार ६८५ ग्राहक आणि अहिल्यानगर मंडळात ९ हजार ११३ ग्राहकांकडे सौर यंत्रणा स्थापित करण्यात आली आहे. नाशिक परिमंडळातील एकूण २५ हजार ३४३ ग्राहकांकडे ५८.२५ मेगावॅट क्षमतेची सौर यंत्रणा उभारण्यात आलेली आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला ३० हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला ६० हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. हाउसिंग सोसायट्यांनाही ५०० किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट १८ हजार रुपये अनुदान मिळते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार महिना अंदाजे १२० युनिट वीजनिर्मिती होते. . छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीजबिल शून्य येते याशिवाय, सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांनाही आर्थिक लाभ होतो.रूफ टॉप सोलर उभारणाऱ्या ग्राहकांना आवश्यक असणारे नेट मीटर सुद्धा मोफत लावण्यात येत असून त्याचप्रमाणे १० किलोवॅट पर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात ग्राहकांना बँकेकडून कर्ज सुद्धा उपलब्ध आहे.
वीजग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे तसेच नोंदणी करण्यासाठी पीएम – सूर्यघर हे अत्याधुनिक मोबाईल अँप उपलब्ध आहे. त्यावर नोंदणी केल्यानंतर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. यासंदर्भात अधिक माहितीसाठी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा आणि ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.