अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विदर्भातील अनेक भागात प्राचीन काळी शिवशंकराची पूजा केली जात असे. हा प्रांत अगदी रामायण महाभारत काळापासून वेगवेगळ्या नावाने ओळखले जातो. अमरावतीपासून ८० किलोमीटर अंतरावर मोर्शी तालुक्यात या ठिकाणी तीनशेहून अधिक शैलगृहे आणि हजाराहून जास्त शैलचित्रे व कोरीव चित्रे आढळली आहेत. याच सातपुडा पर्वतराजींमध्ये इतिहास अभ्यासकांनी पुरातन शिवलिंगाचा शोध लावला आहे. हे शिवलिंग वैदिक काळापूर्वीचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे अमरावतीचे ज्येष्ठ संशोधक डॉ. व्ही. टी. इंगोले यांच्या नेतृत्वातील चमूने हे शिवलिंग शोधून काढले आहे. डॉ. इंगोले, तसेच प्र. सु. हिरूरकर, पद्माकर लाड, डॉ. मनोहर खोडे, कुमार पाटील आणि दिवंगत ज्ञानेश्वर दमाहे या सहा निसर्गप्रेमींच्या चमूने सातपुड्यातील तापी खोऱ्यात धारूळ गावानजीक चित्रगुहांचा शोध प्रथम जानेवारी २००७ मध्ये लावला.
भटकंतीदरम्यान त्यांना या गुहा दिसल्या होत्या. आदिमानवांचे हे वसतिस्थान सुमारे पंधरा हजार वर्षांपूर्वीचे असावे, असा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता. पण, सखोल संशोधनातून हे वसतिस्थान ३५ हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे चित्रगुहेतील दगडावर कालभैरवाचे नृत्य करतानाचे चित्रही रेखाटले आहे. तसेच जवळील एक शैलगृहात पांढऱ्या रंगातील ‘ॐ’ आकृती आहे. याबाबतचे आमचे संशोधन हे संक्षिप्त असून, ते खोलवर आणि व्यापक स्वरूपात होणे आवश्यक आहे, असेही डॉ. इंगोले म्हणाले. तसेच सहा वर्षांतच अशा ३० चित्रगुहा या चमूने शोधून काढल्या. ‘मुंगसादेव चित्रगुहा’ असे एका गुहेला नाव देण्यात आले आहे. समुद्रसपाटीपासून ही गुहा ५७५ मीटर उंचीवर आहे.
याच परिसरात एक शिवलिंग आढळून आले. त्याची लाल रंगाने पूजा होत असल्याच्या स्पष्ट खुणा दिसतात. हे शिवलिंग वैदिकपूर्व काळातील असल्याचा दावा संशोधकांच्या चमूने केला आहे. या परिसरात चित्रगुहेतील शहामृग पक्ष्याचे चित्र आढळले होते. इंगोले यांनी या चित्राचा अभ्यास करून शोधनिबंध सादर केला. याला अनेक संशोधकांनी मान्यता दिली आहे.
भारतातील त्या काळातील ही अश्मयुगीन मानवाची सर्वांत मोठी आणि प्राचीन वसाहत असू शकते. या भागात अश्मयुगीन, कांस्ययुगीन वसाहती आढळून आल्या आहेत. तसेच लोहयुगातील भैरव किंवा भूतनाथ व अन्य काही युद्धचित्रांचाही तेथील संपदेत समावेश आहे. युनोस्कोने भीमबेटकाला जागतिक वारसा स्थळ घोषित केले. या स्थळालाही तो दर्जा मिळावा, अशी संशोधकांची मागणी आहे.
Satpura Hills Found Historic Ancient Shivling Researcher Team