माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
सातपूर : जातीवाद-धर्मवाद संपविण्यासाठी सातपूरकर एकवटले असून पहिल्यांदाच राजकारण विरहित भीमोत्सव साजरा करत असून, संपूर्ण राज्याला सातपूर शहर एक रोल मॉडेल ठरणार असल्याची माहिती माजी सभागृहनेते तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.सातपूर भिमोत्सव समितीच्या वतीने एक शहर, एक भिम महोत्सव साजरा होत असून त्या निमित्त १३ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिलदार पाटील बोलत होते. व्यासपीठावर माजी स्थायी समिती सभापती तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सलीम शेख, कार्यक्रमाच्या उद्घाटक इंदुबाई नागरे, माजी सभापती योगेश शेवरे, रवींद्र धिवरे, माजी नगरसेविका सविता काळे, अरुण काळे, बजरंग शिंदे, काळू काळे, रवी काळे, अर्जुन धोत्रे, विजय अहिरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, सातपूरकरांनी एक शहर, एक भिममहोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेत एक नवीन पायंडा पाडला असून भविष्यात संपूर्ण राज्यात अशाच प्रकारे भीमोत्सव साजरा व्हावा अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष सलीम शेख म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका जाती धर्माचे नेते नसून संपूर्ण बहुजनांचे ते नेते आहे. हा संदेश सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवा या हेतूने सातपूर भीमउत्सव समितीने आपल्या कार्यकारणीत सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना समाविष्ट केले आहे. सुमारे साठ वर्षानंतर प्रथमच अश्या प्रकारचा भीमोत्सव साजरा होत असून नाशिकलाच नव्हे तर संपूर्ण राज्याला हेवा वाटावा असा हा भीम उत्सव साजरा होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबडेकरांना डोक्यावर न घेता, त्यांचे विचार डोक्यात रुजवण्याची गरज आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून ते दीक्षाभूमी पर्यंतचा जीवनपट साकारणारे नाट्य आयोजित केले असल्याचे शेख यांनी सांगितले.
यावेळी नंदकुमार जाधव,जुनेद शेख, बंटी लबडे, सचिन सांगळे, सचिन सिंन्हा, वैभव महिरे, निशांत शेट्टी, प्रशांत जगताप, सत्यवान चक्रे, भारत भालेराव, मनीषा साळवे, मीरा धिवरे,आदींसह भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी काळे यांनी तर आभार योगेश गांगुर्डे यांनी मानले.
१३ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान भिमोत्सव
सातपूर भिमोत्सव समितीच्या वतीने १३ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान भिमोत्सव साजरा होत असून यात १३ एप्रिल रोजी राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथे सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव व शिवजन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा गीता जाधव यांच्या वतीने बसविण्यात आलेल्या सिसिटीव्ही कॅमेऱ्याचे उदघाट्न. साय.७ ते रात्री ११ पर्यंत साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांचा भीमगीतांचा कार्यक्रम. रात्री १२ वाजता पुतळ्यास पुष्पार्पण. १४ एप्रिलला सकाळी ११ वाजता संविधान रथाची प्रतिकृती असलेला चित्र रथ पूजन व परिसरातून महिलांची माेटारसायकल रॅली. १५ ला शिवाजी नगर येथे कुस्त्यांची दंगल. १७ एप्रिल रोजी डॅा. शैलेंद्र बागडे दिग्दर्शित १५१ कलाकारांचा समावेश असलेले डॅा. भीमराव आंबेडकर हे महानाट्य. २४ ला सातपूर कॉलनी येथे भीम फेस्टिवल.