पश्चिमेकडील रस्ता पूर्वेकडे
सातपूर : १९९३ च्या सातपूर शहर विकास आराखड्यात छेड छाड करून आपला मनमानी कारभार हाकणाऱ्या नाशिक मनपाच्या अधिकाऱ्यांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांसह नगरविकास विभागाकडे तक्रार करत शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख देवा जाधव यांनी मनपाच्या अनागोंदी कारभाराचे दर्शन घडवले आहे.
१९९३ च्या शहर विकास आराखड्यामध्ये सातपूर परिसरातील पपया नर्सरी ते साईबाबा मंदिर हा १८ मीटर रस्ता पश्चिमेकडे दर्शविला आहे. सद्यस्थितीत हा रस्ता विकसित करण्याचे काम सुरु असून सदर रस्ता हा पश्चिमेकडून न करता पूर्वेकडून विकसित केला जात आहे. काही बलाढ्य भांडवलदारांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना हाताशी धरून ह्या डीपी प्लॅन मध्ये छेडछाड केल्याचे प्राकर्षाणे जाणवत असल्याचा आरोप देवा जाधव यांनी केला आहे.
शहरातील अनेक डीपी रस्ते डीपी प्लॅन नुसार विकसित झाले, मात्र हा रस्ता रहदारी वस्तीतील असून देखील विकसित केला जात नाही. विकास आराखड्यानुसार रस्ता विकसित न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.
….
उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
१९९३ च्या शहर विकास आराखड्यात हा रस्ता पश्चिमकडे दिसत आहे. मात्र नगररचना विभागाचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात मोठी आर्थिक उलाढाल होत या आराखड्यात छेडछाड करून हा रस्ता पश्चिमकडून पूर्वेकडे सरकवला आहे. त्यामुळे अनेक गोरगरीबांच्या घरांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
– देवा जाधव, उपमहानगरप्रमुख, शिवसेना
….
सर्वसामान्यच्या घरावर पडणार हातोडा
सन १९९३ च्या शहर विकास आराखड्यानुसार धनदांडग्यांच्या प्लॉटची जागा जाणार होती. मात्र ती जागा वाचविण्यासाठी चक्क सर्वसामान्यच्या घरावर हातोडा पाडण्याचे नियोजन त्यांनी केले असल्याची चर्चा सातपूर परिसरात उघडपणे केली जात आहे.