सातपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवजन्मोत्सव समितीच्या सातपूर अध्यक्षपदी सचिन गांगुर्डे तर कार्याध्यक्षपदी वृषाली सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. शिवजन्मोत्सव समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अध्यक्षपदासाठी धीरज शेळके, दीपक वाघचौरे, अशोक पारखे, पंकज पाटील, समाधान देवरे,स्वप्नील पाटील यासह डझनभर तर कार्याध्यक्षपदासाठी रोहिणी देवरे व घुगे यांची नावे समितीकडे आली होती. मात्र बिनविरोधाची परंपरा खंडित होऊ नये यासाठी प्रतिस्पर्धेकांनी माघार घेत सचिन गांगुर्डे व वृषाली सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्व पक्षीय व सर्व समाज समावेशक अशी ही निवड प्रक्रिया करण्यात आली.दरम्यान, उपाध्यक्षपदी दीपक वाकचौरे व रोहिणी देवरे, चिटणीसपदी धीरज शेळके, सहसचिव हेमंत घुगे तर खजिनदारपदी जीवन रायते, राजेश खताळे व गौरव जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
उर्वरित कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्यास कोअर कमिटीने सांगितले. सातपूर विभागातील ज्या शिवप्रेमींना समिती मध्ये काम करायचे आहे, त्यांनी सदर बैठकीला उपस्थतीत रहाण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी माजी नगरसेवक योगेश शेवरे, समितीचे माजी अध्यक्ष किशोर निकम, निवृत्ती इंगोले, संजय राऊत, हिरामण रोकडे, स्वप्नील पाटील, हेमंत शिरसाठ, रवी देवरे, राजेश खताळे,लोकेश गवळी, ज्ञानेश्वर निगळ, बाळासाहेब जाधव, गौरव जाधव आदीसह शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थतीत होते.