सातपूर : सर्वपक्षीय नगरसेवकांनी सोमवारपासून सातपूर लॉकडाऊनची हाक दिलेली असताना, सातपूर कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केटमधील भाजी विक्रेते व मटण विक्रेत्यांनी शनिवारपासूनच बंद पाळत या लॉक डाऊनमध्ये उडी घेतली आहे. विशेष म्हणजे शासनाने सूट दिलेल्या किराणा दुकानदारांनीही स्वयंस्फूर्तीने या बंद मध्ये उडी घेतल्याने कोरोनाची परीस्थिती किती भयंकर आहे याची प्रचिती येत आहे.
दिवसेंदिवस वाढत जाणारी काेराेनाची रुग्णसंख्या व मृत्युच्या घटना बघता काेराेनाची साखळी ताेडणे आवश्यक आहे. शासनाला थेट लाॅकडाऊनचा निर्णय घेणे अडचणीचे असले तरी सामाजिक भावनेतून अधिक निर्बंध असणे गरजेचे आहे. त्यामुळे कारखाने वगळता सातपूर शहर आठ दिवस लाॅकडाऊन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने शनिवारी सकाळी प्रभाग ११ चे नगरसेवक सलीम शेख यांनी जनजागृती करण्यासाठी व्यवसायिकांना सोमवार पासून बंद पाळण्याचे आवाहन केले. व्यवसायिकांनी देखील शेख यांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत सोमवारपासून बंद कारण्याऐवजी आजपासूनच बंद पाळत असल्याचे सांगून लागलीच आपली दुकाने बंद केली. विशेष म्हणजे शासनाने सूट दिलेल्या किराणा दुकानदारांनीही स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने बंद केली.
इतरत्रही सातपूर पॅटर्न राबणार
कोरोनाची परिस्थिती बघता लॉक डाऊन शिवाय पर्याय नाही. शासनाला थेट लाॅकडाऊनचा निर्णय घेणे अडचणीचे असले तरी सामाजिक भावनेतून आपणच स्वयंस्फूर्तीने लॉक डाऊन करणे हाच पर्याय दिसून येत आहे. त्याअनुषंगाने सर्वपक्षीय बैठक घेत लॉक डाउनचा निर्णय घेतला आहे. सोमवार पासून होणारे लॉक डाऊनला शनिवार पासूनच सुरुवात झाल्याने कोरोनाची परिस्थिती लक्षात येत आहे. सातपूरचा हा पॅटर्न इतरत्र ही राबवला जाईल ही खात्री आहे
– सलीम शेख, नगरसेवक