अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
धुळ्यात शिवसेनेचे महानगर प्रमुख असलेल्या सतीश महाले यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयास पाठींबा देऊन महानगर प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचं सतीश महाले यांनी राजीनामा पत्रात नमूद केलंय . दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ धुळे जिल्ह्यातील हे पहिलं राजीनामास्त्र आहे. साधारण दीड वर्षांपूर्वीच सतीश महाले यांची धुळे महानगर प्रमुख म्हणून निवड झाली होती. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात सतीश महाले म्हणतात सध्याच्या राज्यातील चालेल्या राजकीय घडामोडींना अनुसरून नमूद करू इच्छितो की, मागील काळात वेळोवेळी मला आलेल्या राजकीय , सामाजिक अडचणींमध्ये, संकटसमयी एकनाथ शिंदे हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, तेव्हा पासून मी सतत त्यांच्या संपर्कात आहे.म्हणून सद्य परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयास पाठिंबा देऊन मी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला असल्यानं मी माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला जागून माझा महानगर प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, तो आपण स्वीकार करावा. असं सतीश महाले यांनी उद्धव ठाकरेंना लिहलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी राजीनामा देणाऱ्या सतीश महाले यांच्यासह आणखी कोणी राजीनामा देणार का ? याबाबत सतीश महाले यांनी मात्र ना पत्रात कुठे उल्लेख आहे, ना ही तशी त्यांनी माहिती दिलीय.