सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मीडियावर कधी, काय हिट होईल सांगता येत नाही. कधी कुठली गोष्ट कुणाला रातोरात सुपरस्टार बनवून जाते तर कधीकधी एखादी पोस्ट वादग्रस्त ठरून समाजात ताणतणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. अशातच सोशल मीडियावरील एका पोस्टने सातारा पेटविले आहे. तेथील परिस्थिती लक्षात घेत इंटरनेट सेवादेखील खंडीत करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे रविवारी (१० सप्टेंबर) एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी तातडीने परिस्थिती आटोक्यात आणली. या घटनेनंतर साताऱ्यात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. याबाबत अफवा पसरत असल्याने सातारा पोलीस अधीक्षकांनी सोमवारी (११ सप्टेंबर) निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली आहे.
सातारा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार,‘१० सप्टेंबर २०२३ रोजी पुसेसावळी येथे एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या पोस्टवरुन लोकांचा गैरसमज होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला होता. या ठिकाणी तात्काळ सातारा पोलीसांनी प्रतिसाद देऊन या ठिकाणची परिस्थिती आटोक्यात आणली. सध्या पुसेसावळी व परिसरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिलेला नाही. या ठिकाणी शांतता आहे. तसेच आवश्यक त्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.’
अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन
जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण होणारे संदेश प्रसारीत करू नयेत. जेणेकरुन कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क व दक्ष राहून काही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा पोलिसांनी केले.
Satara Social Media Post Tense Police Internet Crime