सातारा – राज्यातील विविध जिल्ह्यामधील जिल्हा बँकेच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखांना पार पडत आहे. यामध्ये काही ठिकाणी पक्षाचे पॅनल उभे करण्यात आले असून काही ठिकाणी मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तयार केलेले पॅनल दिसून येत आहे. मात्र अनेक ठिकाणी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सहाजिकच त्यातून याची परिणीती म्हणजे पक्षांतर्गत नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे.
जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यात मोठी राडेबाजी झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या १ मताने पराभव झाला. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते ज्ञानदेव रांजणे यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावरही राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा, पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा फोटो आहे. याच कार्यालयावर शशिकांत शिंदे यांच्या कार्याकर्त्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीनंतर साताऱ्यात तणाव निर्माण झाला आहे.
शिंदे म्हणाले की, मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो, ज्या नेत्यांनी मला राजकीय क्षेत्रात उभे केले. त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका, ही भूमिका योग्य नाही, तसेच मी जाहीर माफी मागतो, भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केले असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो. मी एका मताने पराभूत झालो, तो स्वीकारतो. माझ्या पराभवामागे फार मोठे कारस्थान होते, ते येत्या काळात समोर येईल,असेही शशिकांत शिंदे म्हणाले.
सातारा, सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या जिल्हा बँकांच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे जाणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते, त्यातच साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला असून शिंदे यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे यांचा विजय झाला आहे. शशिकांत शिंदे यांना २४ मते मिळाली असून विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना २५ मते मिळाली आहेत. शशिकांत शिंदे यांचा पराभव हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का समजला जात आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ९६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २१ जागांसाठी ही लढत असताना यातील ११ जागा या बिनविरोध झाल्या होत्या. मात्र उर्वरीत दहा जागांसाठी झालेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावर तणाव पहायला मिळाला.
साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि कोरेगाव मतदार संघाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात सध्या चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांना दम देत म्हटले होते की, माझी वाट लागली तरी चालेल, पण मी त्याचे सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीचे पॅनल आहे. तर महाविकास आघाडीतील पक्ष नेते एकमेकांसमोर उभे ठाकले होते.