सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकीकडे शेतकरी पावसामुळे हवालदिल झाला आहे, दुसरीकडे विदर्भात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी त्रस्त आहे, पण अशाही परिस्थितीत काही आशादायी चित्र शेतकरी निर्माण करीत आहेत. यात साताऱ्यातील फलटण तालुक्यात असलेल्या धुमाळवाडीचा नंबर पहिला लागतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
धुमाळवाडीची लोकसंख्या लक्षात घेतली आणि या गावाची भौगोलिक स्थिती बघितली तर केवळ फळबागेतून हे गाव वर्षाला २५ कोटींची उलाढाल करीत असेल यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे आणि त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. तसेही धुमाळवाडी हे राज्यात फळांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचे गाव आहेच. पण आता उलाढाल लक्षात घेतली तर काही वर्षांमध्ये वेगळा विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.
डोंगरात वसलेल्या धुमाळवाडीत फळबागांसाठी पोषक वातावरण आणि हलकी जमीन आहे. अनुकूल नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती असलेल्या धुमाळवाडीत १९८०पासून डाळिंबाची लागवड होत आहे. १९९०नंतर फळबाग लागवडीने गती घेतली. प्रामुख्याने डाळिंबाची लागवड होत होती. पण, तेल्या आणि मर रोगामुळे डाळिंबाचे नुकसान झाले आणि शेतकरी अन्य पिकांकडे वळाले.
द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, अंजीर, केळी, जांभूळ, ड्रॅगन फ्रूट, चिकू, लिंबू, संत्री, नारळ, आंबा, पपई, लिची, सफरचंद, अॅपल बोर आणि विविध प्रकारच्या बेरी अशा सुमारे २० प्रकारच्या फळबागांची लागवड गावात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना सरळ लागवड शक्य नाही, त्यांनी शेतजमिनीच्या बांधावर सफरचंद, काजू, लिची, मोसंबी, फणस, करवंद, बोर, खजूर, ब्लॅकबेरी, तुती, स्टार फ्रूट, वॉटर अॅप्पल अशा विविध फळांची लागवड केली आहे.
जेमतेम १३०० लोकसंख्या
धुमाळवाडीत जेमतेम २०० कुटुंबे आहेत आणि लोकसंख्या केवळ १३०० आहे. एकूण १७१६ हेक्टर जमिनीपैकी १३४५ हेक्टर डोंगराळ जमीन असून लागवडीयोग्य ३७१ हेक्टरपैकी २७५ हेक्टरवर २०हून अधिक फळांची लागवड होते. या फळशेतीतून वर्षांला तब्बल २५ कोटींपर्यंत आर्थिक उलाढाल धुमाळवाडीत होते.
अख्ख्या गावात ठिबक सिंचन
फळांचा दर्जा, गुणवत्ता व उत्तम चव यामुळे धुमाळवाडीतील फळांना बाजारपेठेत मागणी आहे. काही शेतकरी सेंद्रीय पद्धतीने फळांचे उत्पादन घेत आहेत. गावातील सर्व शेतीसाठी ठिबक सिंचनाची सोय आहे. उत्पादित फळांची बांधावरच थेट विक्री होत आहे. प्रतिवर्षी फळबागेच्या माध्यमातून येथे सुमारे २५ कोटींची उलाढाल होते. आता उत्पादित फळांवर प्रक्रिया करण्यासाठी गावातील तरुण शेतकरी पुढे येत आहेत.
Satara Dhumalwadi Fruit Village Success Story Agriculture Farmers