सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वास्तव्य ठाण्यात असले तरीही सातारा जिल्ह्यातील दरे हे त्यांचे मूळ गाव आहे. या गावाची खबर ते ठेवत असतात आणि अडचणी सोडविण्यासाठी अधिकारीही सज्ज असतात. पण याच गावात ‘शासन आपल्या दारी’ असे म्हणत गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी आम्ही एका विभागामुळे त्रस्त आहोत, अशी कैफियत मांडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच सातारा जिल्ह्यात शासन आपल्या दारी या अभियानाचा शुभारंभ केला. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी दररोज एका गावात जाऊन तिथल्या समस्या जाणून घेतात. त्यावेळी जवळपास सर्वच महत्त्वाच्या विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित राहतात. जिल्हाधिकाऱ्यांचा हा उपक्रम सुरू असतानाच शुक्रवारी ते मुख्यमंत्र्यांच्या गावात पोहोचले. त्यावेळी त्यांनी आसपासच्या गावातील नागरिकांच्याही समस्या जाणून घेतल्या.
मुख्यमंत्र्यांच्या दरे गावासह आसपासच्या सर्वच गावांनी महावितरणच्या कारभारामुळे त्रस्त असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. दरे आणि आसपासच्या सर्वच गावांनी आपल्या विविध समस्या सांगितल्या, पण यात सर्वाधिक समस्या महावितरणच्या बाबतीत होत्या, असे पुढे आले आहे. गंमत म्हणजे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि ज्या गावात महावितरणच्या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या ते गाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. त्यामुळे प्रशासनात राज्याच्या प्रमुखांचेही भय नाही, असे बोलले जात आहे.
पुढे काय करणार?
महाराष्ट्रात घोषित असो वा अघोषित असो लोडशेडिंग सुरू झाले की सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसतो. शहरात एक तास लाईट जाणार असतील तर गावांमध्ये १२ तास लाईट नसतात. अश्या परिस्थितीत गावकऱ्यांनी महावितरणच्या संदर्भात केलेल्या तक्रारी कश्या दूर होतील, हा प्रश्न आहे. कारण महाराष्ट्रात चाळीस हजारांहून अधिक गावे आहेत. त्यामुळे फक्त मुख्यमंत्र्यांच्या गावासाठी वेगळा नियम लावणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते उद्घाटन
सातारा जिल्ह्यातील पाटण गावात ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा शुभारंभ स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला होता. संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. पण जिल्हाधिकाऱ्यांनी टाकेलल्या पहिल्याच षटकात ‘नो बॉल’ पडल्यामुळे अधिकारी धास्तावले आहेत.
Satara Collector CM Village Dare Complaints