सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या मुळगावाकडून मुंबईकडे परतणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत माहिती मिळताच त्यांना प्रत्यक्ष भेटून जमिनीवर बसून त्यांच्याशी संवाद साधला. या दाम्पात्याची आपुलकीने विचारपूस करुन जिल्हा प्रशासनाला वृध्द दाम्पत्याच्या पुनर्वसनाचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. संवेदनशील स्वभाव कृतीतून दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृद्ध दाम्पत्याचे पुनर्वसन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
आपल्या मुळ गावी दरे येथे वास्तव्यात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तापोळा आणि दरे दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी एका ग्रामस्थाने त्यांना जवळच एक निराधार वृद्ध दाम्पत्य रहात असल्याचे निदर्शनास आणून दिले. क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्री श्री. शिंदे त्यांच्या भेटीला गेले.
पिंपरीतांब येथील भागडवाडीतील ७५ वर्षाचे विठ्ठल धोंडू गोरे आपल्या पत्नीसह याठिकाणी राहतात. त्यांची देखभाल करणार कुणीही नसल्याने आहे त्या तुटपुंज्या संसारात ते दोघं उघड्यावरच रहातात. मुख्यमंत्री श्री. शिंदे त्यांच्याजवळ गेले. थेट जमिनीवर बसून त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पावसाळ्यात तुम्ही अशा अवस्थेत कसे राहणार..? त्याऐवजी गावाजवळ का रहात नाही असे त्यांना विचारले. मात्र त्यावर त्यांनी काहीही ठोस उत्तर दिले नाही. अखेरीस मुख्यमंत्र्यांनी या दाम्पत्याला पावसाळ्यात लागेल तेवढे अन्न धान्य आणि मदत देण्याचे निर्देश दिले. अशा ठिकाणी राहत असल्याने त्यांना अचानक मदत लागल्यास कुणीही मदत करू शकणार नाही त्यामुळे गावाजवळ रहावे असेही मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना या वृद्ध दाम्पत्याचे त्वरित पुनर्वसन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.