सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी म्हणून अनेक जण आयुर्वेदिक काढा घेत होते, आरोग्य तथा वैद्यकीय शास्त्र अनेक पॅथी आहेत. त्यात प्रामुख्याने निसर्गोपचार आयुर्वेद, योगशास्त्र, अॅलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी आदींचा समावेश आहे. आयुर्वेद औषधींचा कोणताही साईड इफेक्ट किंवा दुष्परिणाम होत नसल्याने अलीकडच्या काळात आयुर्वेदिक औषधींकडे नागरिक वळू लागले आहेत. परंतु कोणतेही औषध हे वैद्य तथा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवे, अन्यथा त्याचे वाईट परिणाम होऊ शकतो. फलटण शहरात देखील अशीच एक घटना घडली. रात्री जेवण केल्यानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्यामुळे वडील व मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
नेमकं काय घडलं
हणमंतराव पोतेकर (वय ५५ वर्ष) आणि अमित पोतेकर (वय ३२ वर्ष) अशी मृत बाप-लेकांची नावे आहेत. मुलगी श्रद्धा पोतेकर हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणात शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमका मृत्यू कशामुळे झाला हे समोर येणार आहे. दरम्यान हनुमंतराव पोतेकर, त्यांची पत्नी, मुलगा अमित व मुलगी श्रद्धा यांनी शनिवारी रात्री एकत्रित जेवण केले. त्यानंतर हनुमंतराव, अमित व श्रद्धा यांनी आयुर्वेदिक काढा प्राशन केला. काढा प्यायल्यानंतर हे सर्वजण झोपी गेले. मात्र, मध्यरात्री या तिघांना त्रास होऊ लागला.
शवविच्छेदन अहवाल
तिघांना अचानकपणे त्रास होऊ लागल्याने घरातील सगळेजण घाबरले. त्यामुळे त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटेच्या सुमारास वडील हनुमंतराव व मुलगा अमित यांचा अवघ्या १५ मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. तर मुलगी श्रद्धा हिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. या घटनेमुळे पोतेकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. आयुर्वेदिक काढा घेतल्यानंतर त्रास होऊन बाप-लेकांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. जेवणानंतर घेतलेल्या काढ्यामुळे मृत्यू झाला का? अशी चर्चा परिसरात सुरू होती. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. बाप-लेकांच्या मृत्यमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मात्र कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.