सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागलाणचे भूमिपुत्र व सटाणा शहरातील रहिवासी डॉ.अथर्व अनिल ततार यांनी किरगीस्थान (रशिया) या देशातील ओश स्टेट मेडिकल विद्यापीठातून बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी ही पदवी मिळवत उज्वल यश संपादन केले आहे. ओश विद्यापीठात झालेल्या पदवीदान सोहळ्यात विद्यापीठाचे कुलगुरू रोमन कालमारोव यांच्या हस्ते डॉ.अथर्व ततार यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ.ततार यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सटाणा शहरातील बागलाण एज्युकेशन सोसायटी संचलित बेस्ट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. तर बाभुळगाव (ता.येवला) येथील संतोष दराडे महाविद्यालयात त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथे ज्ञानमुद्रा टिटोरियल येथून सीईटी नीट परीक्षा पास होऊन त्यांनी पुढील शिक्षणासाठी गुणवत्तेच्या बळावर किरगीस्तान (रशिया) देशातील ओश स्टेट मेडिकल विद्यापीठात प्रवेश मिळविला. सहा वर्षे एमबीबीएसचा कठोर अभ्यासक्रम अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी प्राप्त केली.
दरम्यान, कोरोना काळात भारतात सुट्टीवर आलेल्या डॉ.अथर्व ततार यांनी घरी न थांबता प्रख्यात सर्जन डॉ.योगेश विंचू, डॉ.प्रकाश जगताप, डॉ.प्रवीण अहिरे, डॉ.वजीर, डॉ.प्रवीण अहिरे व डॉ.हरजीत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनायोद्धा बनून सटाणा शहरातील सिम्स रुग्णालय, चैतन्य रुग्णालय, अपेक्स रुग्णालय, आदि रुग्णालयांमध्ये गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी उत्कृष्ट सेवा बजावली होती. याबद्दल बागलाणचे तत्कालीन तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील व पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता.
डॉ. ततार यांची बहीण दर्शनी ततार यांनी सुद्धा जॉर्जिया (युरोप) देशात शिक्षण घेऊन डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. डॉ.ततार हे शहरातील प्रथितयश व्यापारी नथू ततार यांचे नातू तर व्यापारी अनिल ततार व सामाजिक कार्यकर्त्या रूपाली ततार यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
डॉक्टर बनून गोरगरिबांची सेवा करावी, ही बालपणापासूनची माझी इच्छा होती. तेच स्वप्न उराशी बाळगुन अपार कष्ट, मेहनत तसेच आजी-आजोबा, आई-वडिलांची साथ यामुळेच डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार झाले. परदेशात पदवी प्राप्त केली असली, तरी मातृभूमीची सेवा करण्याची प्रचंड ओढ आहे.
डॉ. अथर्व ततार