निलेश गौतम, सटाणा
आधी गारपीट ,आता दुष्काळ ; रब्बीसह उन्हाळी हंगाम गेला, आता खरीप तरी हातात येईल या अपेक्षेने परत उभारी घेत हातात नांगर घेऊन पेरणी केली… जमिनीत हजारो रुपयांची बियाणे खते पेरली मात्र;पावसाने ओढ दिल्याने आता शेतकरी वर्गाला भीषण दुष्काळी परिस्थिती ने घेरले आहे. खरीपाची पिके हातातून जातील की काय अशी भीती रोजच्या उन्हामुळे पडू लागली आहे. बळीराजाचा मुख्य सण बैल पोळा पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असताना आकाशाकडे डोळे लावून बघणाऱ्या बळीराजावर मात्र गडद दुष्काळाचे सावट पसरले आहे.
कधी नव्हे इतक्या आर्थिक खाईत जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा गेला आहे. उन्हाळी पिकांना गारपीट ने जमीनदोस्त केले तर आता खरिपाला दुष्काळी परिस्थिती ने घेरले आहे. तिन महिने उलटून गेल्यावर ही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने सध्यातरी खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पिके पावसाअभावी कोमजू लागले आहेत .पाऊस येण्याचे कुठलेही चिन्हे दिसत नसल्याने बळीराजा हवालदिल झालेला दिसत आहे ..
एकी कडे कांदा अनुदान जाहीर होऊन 5 महिने लोटले तरी अजुन ते शेतकऱ्याला मिळत नाही तर गारपीट होऊन 4 महिने लोटले तरी सुद्धा अजून ही असंख्य शेतकरी मदती पासून वंचित आहेत. शासनाची कुठलीही मदत हातात नसतांना खरिपाच्या पेरणीला सज्ज होत पेरणी केली मात्र आता आभाळाकडे आशाळभूत नजरेने टक लावून पाहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.एक ना अनेक समस्या बळीराजा पुढे उभ्या राहिल्या आहेत . विजेची समस्या गंभीर झाली आहे.एन पावसाळ्यात इमर्जन्सी लोड शडिंगने डोके वर काढल्याने थोडे फार विहरित असलेले पाणी ही पिकांना देणे अवघड झाले आहे. अश्यातच आता पुढे महत्वाचा सण पोळा येत आहे .पावसाची अशीच स्थिती राहिली तर सण साजरा कसा करायचा याच विवंचनेत बळीराजाला राहावे लागणार आहे.
तालुक्यातील ६ मंडळ डेंजर झोनमध्ये
बागलाण महसुली क्षेत्रात एकूण 8 मंडळे असुन 6 मंडळे हे डेंजर झोन मध्ये गेले आहेत. तर उर्वरित दोन मंडळा मधील ही काही गावे प्रभावित झाले आहेत 29%पिकपाहणी झाली असुन सरासरी पेक्ष्या 40% पाऊस कमी झाला आहे. ऑगस्ट अखेर 72% पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ 39% पाऊस झाल्याने भीषण दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी पिकांचे नुकसान होणाऱ्या सर्वच गावाची माहिती संकलित करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली आहे.
कृषी विभाग मात्र सुस्त…
दरम्यान तालुका कृषी विभाग दुष्काळी परिस्थिती वर प्रभावी काम करतांना दिसत नसुन कार्यालयीन वेळेत या ठिकाणी अधिकारी उपस्थित नसल्याची बाब समोर आली आहे. पावसाळी पिकांसाठी शासणाकडून आलेली औषधें कृषी कार्यालयातच पडून असल्याचे दिसुन आले तर कार्यालयात कोणीच नसतांना मात्र सर्वच पंखे आणि लाईट मात्र सुरू दिसल्याने दुष्काळी परिस्थितीत कृषी विभाग किती दक्ष आहे हेच यावेळी दिसून आले.
Satana Taluka Rainfall Drought Crop Danger Zone
Nashik District Rural Agriculture water Scarcity