निलेश गौतम, सटाणा
मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने उध्दवस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. प्रशासनाने पंचनामे केलेल्या बागलाण मधील सुमारे 134 गावातील गारपीट ग्रस्त 34 हजार 361 शेतकऱ्यांना सुमारे 42 कोटींची नुकसान भरपाई मिळणार आहे. बागलाण तहसील विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या गाव प्रमाणे याद्या तैयार केल्या आहेत.सध्या बँक खात्यांची पडताळणी सुरु असुन काही गावातील शेतकऱ्यांची बँक खाती पडताळणी झाली आहे. डीबीटी प्रणाली ने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली आहे.
एप्रिल महिन्यात झालेली गारपीट बागलाणच्या अनेक गावातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरली होती. उन्हाळी कांदा , टोमॅटो मिरची, पपई सह द्राक्ष, डाळिंब शेती या गारपिटीने उद्धवस्त झाली होती. या गारपीटीचे गांभीर्य लक्षात घेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री दादा भुसेनी बागलाणच्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता. गेली अनेक दिवस शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होता प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याला आता कांदा व इतर पिकांसाठी हेक्टरी 17 हजार तर फळ पिकांसाठी 22हजार 500 चे भरपाई मिळणार आहे. या साठी कृषी विभाग व महसुल विभागाने नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करीत सुमारे 25 हजार हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे केले आहेत. यातील सर्वाधिक नुकसान हे बागलाण च्या पश्चिम भागातील डांगसौंदाणे, सह निकवेल, दहिंदुले, बुंधाटे, चाफ्याचापाडे, साकोडे, तळवाडे, भिलदर, मोरकुरे, पठावे, भागातील शेतकऱ्यांचे झाले होते या भागातील संपुर्ण शेतपिके या गारपिटीने उद्धवस्त झाली होती.
एकाच महिन्यात 3 वेळा झालेली ही गारपीट गत 50 वर्ष्यातील सर्वाधिक नुकसान करणारी ठरली होती. अनेकांची स्वप्ने या गारपिटीने धुळीस मिळविली होती. शासनाने खरीप हंगाम सुरू होण्याआधी भरपाई द्यावी यासाठी या भागात आंदोलने ही झाली होती. आता 5 महिन्यांच्या प्रतीक्षे नंतर शेतकऱ्याना ही नुकसान भरपाई मिळणार असली तरी बँक खात्यांची पडताळणी सर्वच शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. या साठी महसूल विभागाने गाव प्रमाणे याद्या तैयार केल्या असुन ह्या याद्या ग्रामपंचायत, कृषी विभागाच्या वतीने पडताळणीसाठी लवकरच उपलब्ध होणार आहेत कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे झाले आहेत मात्र यादीत नाव नसले अशा ही शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात येणार असल्याचे महसूल सहायक सागर रोकडे यांनी सांगितले आहे .
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संगणकीय डाटा पुर्ण पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या डीबीटी प्रणाली द्वारे शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई थेट बँक खात्यात मिळणार आहे, जे शेतकरीचे नुकसानीचे पंचनामे झाले आहेत मात्र यादीत नाव नसेल अश्या सर्वांची पंचनामे पाहणी करून त्यांना ही नुकसान भरपाई देण्यात येईल.
– कैलास चावडे, तहसीलदार, बागलाण
पश्चिम भागातील शेती मार्च महिन्यातील गारपिटीने उध्दवस्त झाली होती, शेतकऱ्यांना या आधीच मदत मिळणे अपेक्षित होते मात्र उशिरा का होईना मदत मिळत आहे. मदत मिळालेल्या शेतकऱ्यांची बँकांनी अडवणूक करू नये
– संजय सोनवणे, संचालक, बाजार समिती, सटाणा
satana taluka farmer government help compensation
hailstorm unseasonal rainfall