निलेश गौतम, सटाणा
घरात अठरा विश्व दारिद्र्य… आई-वडील शेतमजूर… रहायला छोटेखानी झोपडी… साधनांचा अभाव, पण स्वप्न मात्र मोठं! अशा प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या अंतापुर(बागलाण) येथील १७ वर्षीय योगेश नामदेव सोनवणे या आदिवासी तरुणाने आपल्या जिद्दीच्या बळावर थेट चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय माउंटन बाइक सायकलिंग स्पर्धेपर्यंत झेप घेतली आहे.
योगेशने नुकत्याच पंचकुला(हरियाणा) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय माउंटन बाइक सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ आणि सिल्व्हर अशी दोन पदके पटकावत तो शिकत असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, या कामगिरीमुळे त्याची चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी थेट निवड झाली असून, तो आता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
योगेश सध्या मविप्र संस्थेच्या ताहाराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वी कला शाखेत शिक्षण घेत आहे. शैक्षणिक अभ्यासाबरोबरच सायकलिंगची नियमित मेहनत, अपार जिद्द आणि स्वप्नांची तीव्रता – यामुळे त्याने हे यश मिळवले आहे. योगेश महाराष्ट्रातील पहिला असा खेळाडू ठरला आहे, ज्याची १८ वर्षांखालील गटातून आंतरराष्ट्रीय माउंटन बाईक(सायकलींग) स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
योगेशच्या या यशाबद्दल मविप्र संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि सहकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे. संस्थेचे माजी विद्यार्थी यापूर्वी ऑलिम्पिक स्तरावर खेळलेले असताना, योगेशची झेप ही त्या परंपरेत भर घालणारी ठरली आहे. त्याच्या मेहनतीला योग्य दिशा देण्यासाठी संस्थेने वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन योगेश ला दिले आहे. आज ग्रामीण आणि आदिवासी भागातील अनेक तरुणांसाठी योगेश एक प्रेरणास्रोत ठरत आहे. कुठलीही साधनसंपन्न नसलेल्या वातावरणातूनही मेहनत, चिकाटी आणि जिद्द यांच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचता येते, हे योगेश ने दाखवून दिले असुन तो आदिवासी विदयार्थ्यांसह सायकलींग करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरला आहे.
भारतासाठी सुवर्णपदक जिंकेल..
अंतापुर येथील योगेश सोनवणे ची कामगिरी बागलाण वासीयांसाठी अभिमानाची आहे. अंत्यत प्रतिकूल परिस्थितून आज त्याच्या जिद्द आणि मेहनती मुळे तो पुढे आला आहे. यापूर्वी ही त्याची भेट घेत अभिनंदन केले असून त्याला मदत ही केली आहे. यापुढील काळात ही कुठलीही मदत लागली तर ती लोकप्रतिनिधी म्हणून करणार आहे.
आमदार दिलीप बोरसे..
२७ ला तो मायदेशी परतणार
माझा भाऊ चीनला गेला आहे. २७ ला तो मायदेशी परतणार आहे. अत्यन्त प्रतिकुल परिस्थिती मध्ये या स्पर्धेत पुढे गेला लहान पनापासून जिद्द आणि मेहनत डोळ्यासमोर ठेवत त्याने हे यश मिळविले आहे. भविष्यात त्याला शासनाने व आदिवासी विकास विभागाने मदतीचा हात देत बळ दिले पाहिजे
भरत सोनवणे, भाऊ