सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू बिले भरण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यासोबतच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले असतांना कुणी आव्वाच्या सव्वा बिलांच्या वसुलीसाठी विजेची तोडणी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करत असतील अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना रस्त्याने फिरू दिले जाणार नाही असा गंभीर इशारा बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी दिला आहे. गेली दोन दिवस बागलाण तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रम आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते सुरु होता. त्याप्रसंगी आमदार बोरसे यांच्याकडे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून वीज बिल वसुलीसाठी वीज तोडणी करून पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. त्याची गंभीर दखल घेत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांचे आमदार बोरसे यांनी कान टोचले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला आहे अशा भयावह परिस्थितीत वीज तोडणी करून शेतकऱ्यांच्या जीवाशी कोणी खेळत असेल तर अशा मुजोर अधिकाऱ्यांना पळताभुई थोडी होईल असा इशारा त्यांनी दिला.
जोरण व केळझर वीज उपकेंद्राला मिळणार मोठ्या क्षमतेचे ट्रान्सफार्मर
पश्चिम पट्ट्यातील वीज सुरळीत करण्यासाठी कंधाणे, विंचूरे येथे नव्याने वीज उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहेत. जोरण व केळझर येथे पावर ट्रान्सफार्मर प्रस्तावित करण्यात आले असून लवकरच त्याला मंजुरी मिळून त्या कामाला प्रारंभ होईल असेही आमदार बोरसे यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील रस्त्यांसाठी ७८ कोटींचा भरघोस निधी
आमदार बोरसे म्हणाले की, रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप -सेनेचे सरकार येताच ७८ कोटी रुपयांचा भरीव निधीची दिवाळी भेट दिली.
निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास ६५ कोटींचा प्रस्ताव सादर
आगामी काळात देखील रस्ते विकासा सोबतच निसर्गसौंदर्याने नटलेल्या बागलाणच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्न सुरु असून पहिल्या टप्प्यात सटाणा, दोधेश्वर, भीमाशंकर, मांगीतुंगी, मुल्हेर,अंतापूर, साल्हेर, हरणबारी धरण यांच्या विकासासाठी 65कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे आमदार बोरसे यांनी सांगितले.
मोसम नदीवरील बंधाऱ्याला नूतनीकरण साठी ११ कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश
मोसम नदीवरील प्रथम वर्ग बांधाऱ्यांचे नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले असल्याचे नमूद करून या कामामुळे बागायत शेतीच्या पाण्याची समस्या दूर होणार असल्याचे आमदार बोरसे यांनी शेवटी सांगितले.
कार्यक्रमास भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव,किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंडूशेठ शर्मा, वसाकाचे माजी संचालक बाळासाहेब बिरारी, बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे, संचालक पंकज ठाकरे, तुकाराम देशमुख, कैलास केल्हे, अनंत दिक्षित, पंचायत समितीचे माजी सभापती सोमनाथ सूर्यवंशी, सोपान सोनवणे, लखन पवार, कारभारी बिरारी, जोरणचे सरपंच सुभाष सावकार, माजी सभापती इंदुबाई धूमसे, काळू धूमसे, बाळासाहेब सोनवणे,संजय अहिरे, हेमंत पवार, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, उप अभियंता संजय मोरे, सहाय्यक अभियंता शेखर पाटील आदी उपस्थित होते.