सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुजरात राज्यातून म्हशींची वाहतुक करणारा ट्रक सटाणा ताहाराबाद रस्त्यावर विरगावजवळ पल्टी झाल्याने एका म्हशीचा जागीच मृत्यू झाला. तर एक म्हैस गंभीर जखमी झाली. ट्रक पल्टी होताच भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या एका म्हशीने धुम ठोकली. ट्रकमध्ये एकून १५ म्हशी होत्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सटाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
गुजरात राज्यातून धुळ्याकडे पंधरा म्हशी घेऊन जाणारा हा ट्रक विरगावजवळील लकड्यापुलाजवळ रस्त्यावरील खड्डा टाळण्याच्या नादात पल्टी झाला. हा अपघात झाल्यानंतर ट्रकमधील म्हशी एकमेकांवर आदळल्या गेल्याने एकीचा जागीच मृत्यू झाला तर एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. ट्रक पल्टी होताच परिसरात नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. या घटनेची माहिती सटाणा पोलिसांना मिळताच पोलिस भास्कर बस्ते, पंकज शेवाळे, रविंद्र शिंदे, धनंजय बैरागी यांनी धाव घेत प्रथम स्थानिकांच्या मदतीने ट्रक बाजूला करून म्हशींना सुरूक्षीत जागेवर हलविले. दुतर्फा ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.