सटाणा – तालुक्यातील डांगसौंदाणे विद्युत उपकेंद्रातील प्रशिक्षणार्थी वीज कर्मचारी राजकुमार दिपक गांगुर्डे (२०) या युवकाचा गेल्या २६ जानेवारी २०२२ रोजी मृत्यू झाला. स्थानिक ऑपरेटर, वरिष्ठ तंत्रज्ञ, व कनिष्ठ अभियंता यांच्या हलगर्जीपणामुळे दगडी साकोडे गावातील विद्युत ट्रान्सफार्मर वर काम करतांना मृत्यू झाला होता. एकुलत्या एक मुलाचा केवळ स्थानिक कर्मचारीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याने संपूर्ण गावासह मृत राजकुमारचे नातेवाईक व मित्रपरिवार संतप्त झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. सर्वांची एकच मागणी होती दोषींवर कार्यवाही करा…. या वेळी उपस्थित अधिकारीनी दोषींवर कार्यवाही करण्याचा शब्द देत मृत राजच्या कुटुंबियांना सर्वोतोपरी मदत करण्याचा शब्द दिला होता.
प्रत्यक्षात दिवसामागून दिवस गेलेत कंत्राटी असलेल्या ऑपरेटर वर झालेल्या घटनेची जबाबदारी निश्चीत करून त्याला सेवेतून काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र साकोडे विद्युत ट्रान्सफार्मरवर काम करण्यासाठी ज्या कर्मचारीने जाणे आवश्यक होते त्याचे काय ? आणि त्याला कायम पाठीशी घालणाऱ्या त्या मुजोर विद्युत अभियंताचे काय ? घटनेनंतर एक महिना कामावर न येणारा अभियंता परत त्याच वीज उपकेंद्रावर पाठवत वीज वितरणाच्या वरीष्ठ अधिकारींनी मृत राजकुमारच्या कुटुंबियांची व गावकऱ्यांची कुचेष्टा तर केली नाही ना ? असाच काहीसा सवाल आता या निमित्त उठू लागला आहे.
एरवी घटना घडल्यानंतर विनंती करीत प्रकरण शांत करणाऱ्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची आता चक्क भाषाच बदल्याने मृत राजकुमारच्या आई वडिलांना थेट मंत्रालय., गाठत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषिमंत्री दादा भुसे यांचे दरवाजे ठोठावत न्याय मागितला. शासनाच्या वतीने घटनेची पाहणी करून अहवाल देण्याची जबाबदारी असलेल्या विद्युत निरीक्षकांचा अहवालाच यंत्रणेने मॅनेज केलेला दिसून येत आहे . या अहवालात विजवीतरणला दोषी धरत असतांना मृत राजकुमारला ही दोषीं धरण्याचा प्रयत्न या अहवालात झाला आहे. ज्यांच्या कडून न्यायची अपेक्षा त्यांचाच अहवाल जर मॅनेज होत असेल तर न्याय मागायचा कोणाकडे असाच सवाल मयत राजकुमारच्या वडिलांना पडलेला आहे.
प्रजासत्ताक दिनी मृत्यू होतो आणि याच लोकशाही असलेल्या देशात पोटाच्या मुलाला न्याय मिळावा यासाठी थेट मंत्रालय गाठावे लागते… तर राजकुमारच्या मृत्यूस कारणीभूत असलेला कनिष्ठ अभियंता याच गावात येऊन अजुन ही नोकरी करतो आहे. हे पाहतांना असेच म्हणावे लागेल सरकारी काम सहा महिने थाब ज्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे ते सरळ या प्रकरणात मोकळे सोडण्यात आले आहे.तर काही एक चूक नसतांना हाकणाक बळी गेलेल्या राजकुमारच्या वडिलांना मात्र पोटाच्या गोळ्याला न्याय देण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे.
उडवाउडवीची उत्तरे
मी, विजवीतरणच्या कार्यकारी अभियंत्या कडे वेळोवेळी जाऊन या प्रकरणाची चौकशी करत आहे. मात्र कार्यकारी अभियंता उडवाउडवीची उत्तरे देऊन माझी बोळवण करतात एकुलता एक मुलगा गेल्याचे दुःख एकीकडे तर त्याला न्याय मागतांना विजवितरण कडुन होणारी हेळसांड जीवन असाह्य
करणारे आहे.
दीपक गांगुर्डे, मृत राजकुमारचे वडील
—
कुठलीही कार्यवाही दोषींवर झालेली नाही
प्रशिक्षणार्थी विजकर्मचारी राजकुमार गांगुर्डेच्या मृत्यू नंतर गावातील स्थानिक तरुण आक्रमक झाले होते परस्थिती हाताबाहेर जात असताना आम्ही स्थानिक पुढाऱ्यांनी व पोलीस प्रशासनाने संतप्त तरुण वर्ग शांत केला होता. विजवीतरणच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दोषींवर कार्यवाही करण्याचा शब्द सर्व जनते समोर समोर दिला होता .आता विजवीतरणचे वरिष्ठ अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे खासदार सुभाष भामरे , आमदार दिलीप बोरसे यांनी कडक सूचना देऊन ही कुठलीही कार्यवाही दोषींवर झालेली नाही.
संजय सोनवणे, संचालक सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती