सटाणा: सटाणा मर्चंट को-ऑप. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचारची आज सांगता झाली.सर्वसाधारण १२, अनु. जाती-जमाती १, महिला राखीव २, इतर मागास प्रतिनिधी १, भटक्या विमुक्त जाती-जमाती १ अशा १७ जागांसाठी उद्या मतदान होत आहे. साडेआठ हजार सभासद, संख्या असलेल्या सटाणा व नामपूर अश्या दोन शाखा व शंभर कोटींच्या ठेवींसह कोट्यवधींची उलाढाल असलेली समको बँक तालुक्याची मुख्य अर्थवाहिनी आहे. दोन वर्षांपूर्वी मुदत संपूनही कोरोनामुळे लांबणीवर पडलेली निवडणूक आता होत आहे. या निवडणुकीत १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात असून सत्ताधारी गटातर्फे बँकेचे माजी अध्यक्ष श्रीधर कोठावदे व रमेश देवरे यांच्या नेतृत्वाखालील आदर्श पॅनेल तर विरोधी गटाकडून माजी अध्यक्ष डॉ. व्ही.के. येवलकर यांचे श्री सिद्धिविनायक पॅनल यांच्यात सरळ लढत होत आहे.
निवडणूक जाहीर होताच दोन्ही पॅनल कडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली होती. बँकेचे सभासद हे तालुक्यासह नाशिक येथे देखील असल्याने दोन्ही पॅनलकडून नाशिकमध्ये सभासद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दोन्ही पॅनलच्या वतीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले कोणाच्या मेळाव्याला किती गर्दी याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने तो देखील सभासदांन मध्ये चर्चेचा विषय बनला होता.
दरवेळेस एकतर्फी होणारी निवडणूक या वर्षी चांगलीच चुरशीची होत असल्याचे दिसत आहे. प्रत्येक सभासदा पर्यत कसे पोहोचता येईल यासाठी दोन्ही पॅनलने वेगवेगळे गट करून सर्व सभासदांपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्यात आता सोशल मीडियावर देखील आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू आहेत विरोधी गटाकडून केलेल्या आरोपांना सत्ताधारी उत्तर देत आहेत. आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत कोण खरे आणि कोण खोटे हे आता सभासदच आपल्या मतदानातून दाखवून देतील.