निलेश गौतम, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सटाणा – तालुक्यातील व्यापारी वर्गाची धनलक्ष्मी म्हणुन जिल्हाभर ओळख असलेल्या सटाणा मर्चंट बँकेची निवडणुक सहकार खात्याच्या नियमानुसार येत्या १५ जुन ला होत आहे. १७ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत प्रस्तापिताना धक्का देण्यासाठी विरोधकांनीही कंबर कसली आहेत. बँकेचे ८ हजार ४०० सभासद बँकेची सत्ता नेमकी कोणाच्या ताब्यात देतात हे अजून तरी सांगणे उचित ठरणार नसले तरी पाहिल्यादाच दोन्ही पॅनलकडून ग्रामीण भागातील प्रतिनिधीना संधी देण्यात आल्याने शहर वलय असलेल्या या बँकेच्या प्रचाराची धुन ग्रामीण भागात ही ऐकू येत आहे. बँकेवर तीन पंचवार्षिक सत्ता असलेल्या आदर्श पॅनलच्या नेत्यांना सत्तेपासून दूर खेचण्यासाठी विरोधी सिद्धिविनायक पॅनल जोरदारपणे निवडणूक रिंगणात उतरले आहे. मोसम आणि आरम दोघा खोऱ्यातील उमेदवार सिद्धिविनायक पॅनलकडे आहेत तर आदर्श पॅनल कडे मोसम खोऱ्यातील उमेदवार आहे.
एकूण १७ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत २४ उमेदवार हे सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवीत आहेत. तर चार महिला स्त्री राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवीत आहेत. इमाव प्रवर्गातून मधुन दोन उमेदवार असुन अनु जाती जमाती प्रवर्गातून दोन उमेदवार निवडणूक लढवीत आहेत तर भटक्या विमुक्ती जाती प्रवर्गातून दोन उमेदवार निवडणूक लढवीत आहेत बँकेच्या एकूण १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात असल्याने दोघा पॅनल मध्ये सरळ लढत होणार आहे. तर कायम इमाव प्रवर्गातून निवडणूक लढविणारे सिद्धिविनायक पॅनलचे नेते डॉ व्ही. के. येवलकर यांनी यावेळेस सर्वसाधारण गटातून उमेदवारी करीत नामपूरचे युवा उद्योजक मयूर अलई यांना या गटातून संधी दिली आली आहे. तर आदर्श पॅनलकडून शहरातील व्यापारी दिलीप श्रीकांत येवला यांनी उमेदवारी केली आहे. आदर्श पॅनलने ग्रामीण भागातील ताहराबाद येथील तरुण नेतृत्व आणि जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन कोठावदे यांना उमेदवारी दिली आहे. तर सिद्धिविनायक पॅनलने डांगसौंदाणे येथील प्रतिष्ठित व्यापारी तुकाराम चिंचोरे यांना उमेदवारी दिली आहे. बँकेचे माजी संचालक असलेले श्रीधर कोठावदे यांनी आपल्या सुनबाई रुपाली कोठावदे यांना आदर्श पॅनल मध्ये उमेदवारी देत आपलं प्रतिनिधित्व सुने कडे सोपविले आहे. तर बँकेच्या विद्यमान संचालिका व माजी चेअरमन कल्पना येवला यांनी परत सत्ताधारी गटाकडून महिला राखीव गटातून उमेदवारी केली आहे. सिद्धिविनायक पॅनलकडून शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नथु नारायण ततार यांच्या सुनबाई रुपाली अनिल ततार यांनी उमेदवारी केली आहे. रुपाली ततारांच्या उमेदवारीने बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घरातील संख्या भाऊबंदकीत निवडणूक लागल्याचे बोलले जात आहे. रुपाली ततार यांचे चुलत सासरे असलेले बँकेचे दिवंगत चेअरमन सुभाष ततार यांचे सुपुत्र पंकज ततार आदर्श पॅनल कडून उमेदवारी करीत असल्याने परस्पर विरोधी पॅनल मध्ये दिर व भावजाय यांच्यात लढत मानली जात आहे. तर आदर्श पॅनलकडून अनु. जाती जमाती प्रवर्गातून बँकेचे माजी संचालक प्रकाश सोंनग्रा हे निवडणूक लढवीत आहेत. याच प्रवर्गातून राष्ट्रवादीच्या महिला नेत्या व नगरसेविका सुरेखा बच्याव या सिद्धिविनायक पॅनलकडून उमेदवारी करीत आहेत. बँकेचे विद्यमान चेअरमन व पत्रकार कैलास येवला, रमनलाल छाजेड, जयंवत येवला,मनोज अमृतकर ,स्वप्नील बागड, प्रवीण बागड, निवृत्त पाटबंधारे अधिकारी अशोक गुळेचा, महेश देवरे, अभिजित सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, सर्वसाधारण गटातून आदर्श पॅनलकडून उमेदवारी करीत आहेत तर भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून बँकेचे विद्यमान संचालक जगदीश मुंडावरे हे उमेदवारी करीत आहेत.
सिद्धीविनायक पॅनलकडून बँकेचे निवृत्त व्यवस्थापक दत्तात्रय कापुरे, शहरातील प्रतिथयश डॉ प्रकाश जगताप, भास्कर अमृतकर, किशोर गहिवड, दिलीप चव्हाण, शामकांत बागड, विजय (बाळू) भांगडीया, यशवंत येवला,मुकुंद सोनजे, किशोर सोनवणे, हे सर्वसाधारण जागेतुन निवडणूक लढवीत असुन महिला प्रवर्गातून रजनी येवला तर भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून संजय वाघ हे निवणूक लढवीत आहेत.
निवडणूक १५ जूनला की १९ जूनला अजून संभ्रम कायम
सहकार विभागाने जाहीर केल्या नुसार निवडणूक दिनांक ही १५ जुनच आहे. मात्र शहरातील शाळा सुरू झाल्याने व स्थानिक कार्यालये ही बुक असल्याने निवडणूक तारीख १९ ही होऊ शकते अशी चर्चा आहे.