सटाणा – जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय डांगसौंदाणे येथील १९९८-९९ या शैक्षिणक वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन एस. एस. फार्म चौगावं येथे मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बोरसे सर होते तर येवला सर आणि शेवाळे सर प्रमुख अतिथी म्हणून होते. तब्बल २२ वर्षांनी सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अनौपचारिक पद्धतीने स्थापन केलेल्या कमिटीने सर्वांचे स्वागत गुलाब पुष्प तसेच अस्मंतारा गोळी,पार्ले चॉकलेट आणि संत्रा गोळी अशा त्यावेळच्या चॉकलेट गोळ्या देऊन केले. सर्व मुलींनी खणाच्या साड्या तर मुलांनी व्हाईट कुर्ता पायजमा घातला होता आणि त्यावर नारंगी फेटा अगदी शोभून दिसत होता. नाश्त्याला इडली सांबर तर जेवणात आपल्या बागलाणी आंबा रसावर ताव मारला. बावीस वर्षांनी एकत्र आलेल्या या सर्व मित्र-मैत्रिणींनी मनसोक्त गप्पा- गोष्टी केल्या तसेच काही जुने खेळ व मैत्री वर आधारित गाणे म्हणून नृत्य सुद्धा केले. एस. एस. फॉर्म याठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या राईड्स जसे हॉर्स रायडिंग, ट्रॅक्टर राइड, बोटिंग, सायकल राईड याचाही मनसोक्त आनंद घेतला. शिक्षकांच्या हस्ते त्या ठिकाणी वृक्षारोपण करून त्या वृक्षांना “आठवण १९९९” असे नावही देण्यात आले. यावेळी ३ शिक्षक २९ विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक श्री. प्रशांत बधान यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. प्रतिमा उपासनी यांनी केले. काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शिक्षकांनी पुन्हा एकदा चाळिशीनंतरच्या आयुष्यात आवश्यक असणारे जीवनाचे धडे अगदी बारावीच्या वर्गात पुन्हा एकदा बसल्यासारखे पोटतिडकीने सांगितले. त्यानंतर सौ रुपाली सोनवणे यांनी सर्व गुरुजनांचे तसेच उपस्थित मित्र-मैत्रिणींचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप झाला. असे हे “आठवण १९९९” स्नेहसंमेलन अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने झाले. सायंकाळ झाली परंतु शिक्षक तसेच मित्र-मैत्रिणींचे पाय मात्र घराकडे वळत नव्हते. सर्व आपल्या लहानपणाच्या आठवणी मध्ये रममाण झाले होते. अगदी पुन्हा लवकर भेटू अशा आणाभाका घेत त्यांनी जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला.