अजय सोनवणे, सटाणा
सटाणा तालुक्यातील आराई गावात तब्बल १२५ जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस एकाचवेळी साजरा करण्यात आला. बागलाण तालुक्यातील आराई येथील तरुण युवक व सामाजिक कार्यकर्ते अश्विन अहिरे यांच्या संकल्पनेतून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर तालुक्यात हा वाढदिवस चर्चेचा विषय बनला. एक जून हा सर्वात जास्त वाढदिवस साजरा होणारा दिवस म्हणून असतो, या दिवशी प्रत्येक गावी तरुण आपला वाढदिवस आपल्या मित्रांसोबत मोठ्या उत्साहात साजरा करतात. पण, एकाचवेळी १२५ वाढदिवस आराई येथे उत्साहात साजरे करण्यात आले. त्यामुळे हा कार्यक्रम चर्चेचा ठरला.
अहिरे यांनी ५१ वर्षांपुढील नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना सर्वांना सांगितली. त्यानंतर या संकल्पनेतून कोणताही भेदभाव न करता हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व जेष्ठांना फेटा घालून व गावाच्या प्रवेशापासून ढोल ताशाच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजीमहाराजाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले व भव्य मंडपात सर्व जेष्ठ नागरिकाचे औक्षण करण्यात आले. या कार्यक्रमास गावातील तरूण मोठ्या उत्सवाने सामील झाले. यावेळी दहा किलोचा केकही कापण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित जेष्ठ नागरिकांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होते. आजपर्यंत आमचा वाढदिवस कोणीच साजरा केला नाही. पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच वाढदिवस साजरा झाला अशा जेष्ठांनी व्यक्त केल्या.