डांगसौंदाणे– केळझर गोपाळ सागर धरणातून पाण्याचे तिसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. सध्या आरम नदी ऐन उन्हाळ्यात पात्र दुथडी भरून वाहत आहे. आज याच नदीपात्रातील दहिंदुले जवळील सिमेंट बंधाऱ्यावर चाफ्याचे पाडे (देवपूर ) येथील मामा -भाचे गणेश रामचंद्र जगताप (३२) व रोशन देवेंद्र बागुल (१८) हे आपल्या घरातील कपडे धुण्यासाठी घरातील महीला सोबत गेले होते. दुपारी एक वाजेच्या दरम्यान बंधारे परिसरात अंघोळी साठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दहिंदुले गावाजवळील बंधाऱ्या जवळ मामा गणेश जगताप यांचा मृतदेह स्थानिकांना पाण्यात दिसून आला तर सायंकाळी उशिरा रोशन बागुल यांचा मृतदेह याच बंधाऱ्याच्या पाण्यात स्थानिकांना सापडला. याबाबत सटाणा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
या घटनेने चाफ्याच्या पाडा या गावावर शोककळा पसरली असून या दुर्दैवी घटनेची परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोघेही मामा भाचे स्वाध्याय परिवारातील असल्याने सर्वच गाव शोकसागरात बुडालेले आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेतील भाचा रोशन बागुल याने नुकतीच १२ वी ची परीक्षा दिली आहे. पुढील तपास सटाणा पोलीस निरीक्षक सुहास अनुमोल वार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगन्नाथ लव्हारे, पोलीस हवालदार जयंतसिंग सोळकी, पोलीस नाईक निवृत्ती भोये अधिक तपास करत आहेत.