जिल्हा सिव्हील सर्जन डॉ अशोक थोरात यांची डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयास भेटी दरम्यान दिली माहिती..
डांगसौंदाणे- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेवर असलेला ताण आणि काही अंशी ओसरत असलेली दुसरी लाटेचा ग्रामीण भागातील आढावा घेण्यासाठी आज नाशिक जिल्हा सिव्हील सर्जन डॉ. अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे यांनी जिल्ह्यातील कोविड सेंटर असलेल्या ग्रामीण रुग्णालयांना भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी कोरोनाची ही लाट जरी ओसरत असली तरी आगामी तिसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणा कमी पडू नये यासाठी सर्वत्र उपाययोजना सुरू केल्या आहेत. येत्या १५ जून अखेर जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यन्वित होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले . निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे यांनी ही भेटी दरम्यान ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा ही जिल्हा कार्यालयात बसुन चालविणे आणि प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत चालविणे यात फरक आहे . मी स्वता ग्रामीण भागात आरोग्य सेवा दिली असल्याने ग्रामीण आरोग्याच्या अडीअडचणी मला माहित असल्याने ते सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील असल्याची माहिती डॉ. खैरे यांनी दिली.
आज दुपारी डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयास भेटी दरम्यान शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीत डॉ. थोरात यांनी माहिती देतांना सांगितले की, बागलाण तालुक्यात रुग्णसंख्येचा विचार करता व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन नामपुर कोविड सेंटर सुरू केले आहे. जिल्हा रुग्णालयाचा कारभार हाती घेतल्यापासून ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा सिव्हील सर्जन म्हणून कार्यभार हाती घेतलेले डॉ. अशोक थोरात यांनी ग्रामीण आरोग्य यंत्रणेवर लक्ष केंद्रित केले असून दर १५ दिवसांनी आपण जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व तेथील प्रशासनाचा आढावा घेण्यासाठी स्वता भेट देत पाहणी करीत असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित हेमंत चंद्रात्रे , उपसरपंच सुशीलकुमार सोनवणे,जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान सोनवणे, रुग्ण कल्याण समिती सदस्य निलेश गौतम यांनी डॉ अशोक थोरात डॉ प्रशांत खैरे यांचा सत्कार करीत रुग्णालयाला या भागातील आदिवशी जनतेसाठी अतिरिक्त रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली .
या बाबत तात्काळ मदत करण्याचे आश्वासन डॉ. थोरात व डॉ. खैरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले.. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप घोगडें, डॉ जगदीश चौरे यांचे सह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.