निलेश गौतम..
डांगसौंदाणे-चौंधाणे (बागलाण )- येथील उच्चशिक्षीत असलेल्या लक्ष्मी मधुकर मोरे यांना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते राजभवन येथे गौरविण्यात आले आहे. कोरोना काळात केलेले सामाजिक कार्य आणि त्यातून गरिबांना झालेल्या मदतीची दखल घेत राज्यसरकारने काही निवडक सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला राजभवनात पार पडलेल्या या कार्यक्रमात ग्रामीण भागातील लक्ष्मी मोरे यांना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी गौरविले आहे.
नोकरी निमित्त शहापूर येथे वास्तव्य केलेल्या लक्ष्मी मोरे सध्या पतीच्या सेवानिवृत्तीनंतर आपल्या मुळ गावी सेंद्रिय पद्धतीने शेती व्यवसाय करून शेती व्यवसायत एक वेगळे प्रयोग करणारे कुटुंब म्हणून तालुक्यात सध्या नावलौकिक प्राप्त करत आहेत . आपल्या सेंद्रिय शेती मध्ये मोरे कुटुंब केळी, पपई, रामफळ, सीताफळ, बरोबर सेलम जातीची हळद, सोनामोती गहू, व अन्य कडधान्य सेंद्रिय पद्धतीने पिकवितांना दिसत आहेत कुठलेही रासायनिक फवारणी अथवा खते न देता पिकविलेला शेत माल स्वताच मार्केटिंग करत मुबंई पुणे नाशिक सारख्या ठिकाणी हे कुटुंब हा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोचवत आहेत. यातच सामाजिक कार्याची आवड असलेल्या लक्ष्मी मोरे यांनी विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून तालुक्यातील शाळा, रुग्णालये, व गरीब वाडे वस्ती वर कोरोना काळात मोठ्या प्रमाणवर मदत उभी केली आहे. या मदतीतून त्यांनी लॉक डाऊन काळात ठाण्यातील बहुतांश गरीब रिक्षा चालकांना किराणा माल दिला तर डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य कर्मचारीना कोव्हिडं काळात मोफत जेवणाची व्यवस्था केली होती, ग्रामीण रुग्णालय डांगसौंदाणे येथे पाच ऑक्सिजन सयंत्र, निरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात एक ऑक्सिजन सयंत्र,इचलकरंजी येथे अडकलेल्या कंत्राटी मजुरांना किराणा माल,मुंजवाड व सटाणा येथील धनगर वस्तीतील गरीब लोकांना मोफत किराणा, तर याच वस्तीतील एका तरुणाचा कोव्हिडं ने मृत्यू झाल्यामुळे त्या कुटूंबियाची पालकत्वाची घेतलेली जबाबदारी घेत केलेले सामाजिक कार्य तसेच शैक्षणिक दृष्टया ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नये म्हणून चौंधाने येथील रामगीर बाबा विद्यालयात विविध उपक्रम व शैक्षणिक साहित्य घेऊन देत तालुक्यातील अन्य शाळांना ही नुतनीकरण करण्यासाठी लक्ष्मी मोरे या मदत करत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना गौरविण्यात आले आहे.
आजच्या तरुणांना प्रेरणा मिळेल
मी स्वता ग्रामीण भागातून शिकुन पुढे गेली आहे पती मधुकर मोरे हे सिव्हिल इंजी. होते त्यांच्या निवृत्ती नंतर आम्ही गावाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने गावाकडे आलो आहोत सामाजिक कार्या सोबत सेंद्रिय शेती करीत आम्ही शेतीत वेगळे वेगळे प्रयोग राबवून आजच्या तरुणांना प्रेरणा मिळेल असे काम करत आहोत
सौ.लक्ष्मी मोरे