डांगसौंदाणे- येथील वीज उपकेंद्रातील प्रशिक्षणार्थी कर्मचारी व डांगसौंदाणे येथील रहिवाशी असलेल्या राजकुमार दिपक गांगुर्डे (२१) याचा बुधवारी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान दगडी साकोडे गावाजवळ विद्युत ट्रान्स्फरमरचे काम करत असतांना विजेचा जबर धक्का लागल्याने मृत्यू झाला. या घटनेने डांगसौंदाणे परीसरावर शोककळा पसरली असून यातील दोषी कर्मचारीवर निलंबन व सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी गावातील ग्रामस्थ व तरुणांनी लावून धरत विद्युत उपकेंद्राच्या आवारात तब्बल ४ ते ५ तास ठिय्या आंदोलन केले. कार्यकारी अभियंता सतिश बोंडे यांना घटनस्थळावर बोलावत यातील दोषी लाईनमन, वरिष्ठ तंत्रज्ञ, विद्युत ऑपरेटर, तर स्थानिक अभियंता यांचे निलंबन करण्यात यावे तरच मृत युवकावर अंतिम संस्कार करण्यात येतील अशी भूमिका ग्रामस्थांनी व तरुण वर्गाने घेतल्याने काही काळासाठी तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते.
सटाणा पोलिसांनी घटनास्थळी येत ग्रामस्थ व विजवीतरणच्या अधिकारींमध्ये चर्चा घडवून आणत संबंधीत वरिष्ठ तंत्रज्ञ व ऑपरेटरला तात्काळ निलंबन करीत असल्याचे सांगत चौकशी अंती जे कर्मचारी दोषी असतील त्यांचेवर ही कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता सतिश बोंडे यांनी ग्रामस्थांना व तरुण वर्गाला दिल्याने मृत राजकुमार गांगुर्डे वर डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करण्यात येऊन सायंकाळी उशिरा शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. राज गांगुर्डे येथील दीपक सीताराम गांगुर्डे यांचा एकुलता एक मुलगा होता नुकताच औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांतून इलेक्ट्रिशियनचे शिक्षण पुर्ण करून डांगसौंदाणे विद्युत उपकेंद्रात प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होता. मात्र आज सकाळी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन करीत साकोडे येथे नेमणूक असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष शिरसाठ या कर्मचारीने राज गांगुर्डे याला साकोडे येथील ट्रान्स्फरमर दुरूस्तीसाठी पाठवले मात्र विद्युत उपकेंद्रात कार्यरत असलेल्या कापडणीस नामक ऑपरेटरने जो वीज पुरवठा बंद करणे गरजेचे होते तो न केल्याने राज याला ट्रान्सफार्मवर चढताच विजेचा जोरदार झटका बसल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळाल्याने ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची गर्दी जमली होती यावेळी संतप्त जमावाने संबंधित दोषींवरील कार्यवाहीची मागणी लावून धरत राजकुमार गांगुर्डे ला कायस्वरूपी कर्मचारी प्रमाणे विजवीतरण कंपनीने भरपाई देण्याची मागणी केली.
गेल्या दोन महिन्यांच्या आत गावातील दोघा तरुणांच्या अपघाती मृत्यू मुळे गावावर मोठी शोककळा पसरली होती, सायंकाळ पर्यंत गावातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होते. राजकुमार गांगुर्डे प्रशिक्षणार्थी कर्मचारी असल्यावर सुद्धा स्थानिक अभियंता, लाईनमन,वरिष्ठ तंत्रज्ञ ,यांनी बेजबाबदार पणे कामावर पाठवुन राज कुमारच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. विजवीतरणचे कार्यकारी अभियंता सतिश बोंडे यांची भूमिका ग्रामस्थांना न पटणारी असल्याने गावातील प्रमुख पदाधिकारी आणि अधिकारी सतिश बोंडे यांच्यात तब्बल ४ ते ५ तास चर्चा सुरू होती. अखेर मार्ग निघत नसल्याने सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई यांनी मध्यस्थी करीत विजवीतरणच्या वरिष्ठ अधिकारीना परीस्थितीचे गांभीर्य समजुन सांगत दोघा कर्मचारीं वर कार्यवाही करण्यास भाग पाडले तर घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन सटाणा पोलीस निरीक्षक सुहास अनमोलवर यांनी पोलीस बंदोबस्तासह स्वता येऊन ग्रामस्थाना शांत राहण्याचे आवाहन केले.