सटाणा : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने आदिवासी भागातील जनतेला सुरळीत व उच्च दाबाने विद्युत पुरवठा व्हावा यासाठी गोळवाड (ता.बागलाण) येथील ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राला मान्यता दिली असून त्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रूपयांचा निधीही मंजूर केला आहे. लवकरच हे उपकेंद्र कार्यान्वित होईल, अशी माहिती बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली. दरम्यान, तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील विजेचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत बोलताना माजी आमदार सौ.चव्हाण म्हणाल्या, बागलाण तालुक्यात सुरळीत वीजपुरवठा राहावा, वीजेअभावी शेतकरी व सर्वसामान्य जनतेला कोणत्याही अडचणी उद्भवू नये यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तालुक्यात ३३/११ केव्ही उपकेंद्रांचे जाळे तयार करून तालुक्याचा वीजप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गेल्या सात वर्षांपासून गेल्या सरकारच्या काळात तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आताच्या महाविकास आघाडी सरकारचे ऊर्जामंत्री नितीन राऊत व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांच्याकडे तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील गोळवाडसह चौगाव, निताणे, ब्राह्मणगाव व उत्राणे येथे ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र व्हावे याकरीता सातत्याने प्रयत्नशील होते.
त्यामुळे महाविकास आघाडी शासनाने आदिवासी भागातील जनतेला सुरळीत व उच्च दाबाने विद्युत पुरवठा व्हावा यासाठी पहिल्या टप्प्यात गोळवाड (ता.बागलाण) येथील ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राला मान्यता दिली आहे. या उपकेंद्रासाठी साडेतीन कोटी रूपयांचा निधीही मंजूर केला आहे. तालुक्याच्या आदिवासी भागातील जनतेला उच्च दाबाने विद्युत पुरवठा होत नसल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होऊन रात्रंदिवस अंधाराचा सामना करावा लागायचा. त्यात अपुर्या वीजपुरवठ्यामुळे शेती पंप जळून शेतकर्यांचे मोठे नुकसान होत होते. त्यामूळे जेव्हा वीजपुरवठा सुरळीत असायचा अशाच वेळेत पिकांना पाणी देणे शक्य होत असल्याने आदिवासी बांधवांची मोठी गैरसोय होत होती. मात्र आता गोळवाड येथे ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र मंजूर झाल्याने याचा सर्वाधिक फायदा या भागातील शेतकरी व आदिवासी जनतेला होणार आहे.
दरम्यान, तालुक्यातील मोसम खोर्यातील उत्राणे, निताणे तसेच ब्राह्मणगाव येथेही विजेच्या अनेक समस्या असल्याने शेतकरी व जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या भागातही ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्रांसाठी प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून तालुक्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही माजी आमदार सौ.चव्हाण यांनी स्पष्ट केले.
तिन्ही उपकेंद्रे कार्यान्वित होतील
बागलाण तालुक्यातील निताणे, ब्राह्मणगाव व उत्राणे येथेही ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र व्हावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून या तिन्ही गावातील उपकेंद्रांना लवकरात लवकर निधी देण्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी आश्वासन दिले आहे. लवकरच हे तिन्ही उपकेंद्रे कार्यान्वित होतील.
– दीपिका चव्हाण, माजी आमदार, बागलाण