डांगसौंदाणे – सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन सभापतीपदी तालुक्यातील तळवाडेदिगर गणातील पंकज ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली. बाजार समितीचे मावळते सभापती संजय देवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कृउबा सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा बागलाणचे सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक पक्रिया संपन्न झाली.
आज दुपारी १ वाजता कोरोना संसर्ग नियंत्रणा साठी आवश्यक नियमांचे पालन करुन आयोजित बैठकीत सभापती पदासाठी ठाकरे यांच्या नावाची सूचना संचालक श्रीधर कोठावदे व सरदारसिंघ जाधव यांनी मांडली. तसेच प्रकाश देवरे यांनी अनुमोदन दिले. विहित कालावधीत एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे ठाकरे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर बोलतांना ठाकरे यांनी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करीत तालुक्यात बाजार समितीसाठी डांगसौंदाणे येथे उपबाजार व लखमापूर येथे खरेदी विक्री केंद्र निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपसभापती मधुकर देवरे, प्रकाश देवरे,वेणूबाई माळी, मंगला सोनवणे, प्रभाकर रौदळ, रत्नमाला सूर्यवंशी, संजय बिरारी, केशव मांडवडे,संजय सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, सुनिता देवरे, तुकाराम देशमुख, नरेन्द्र आहिरे,संदीप साळे आदी संचालक उपस्थित होते. निवडीनंतर आ.दिलीप बोरसे, पपुतात्या बच्छाव, मुन्ना सुर्यवंशी, रमेश आहिरे आदींसह पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांचा सत्कार केला. कृउबा सचिव भास्कर तांबे यांनी आभार प्रदर्शन केले. उपस्थितांनी बाजार समिती आवारातील सहकारमहर्षी स्व.दगाजी पाटील व शहरातील शिवछत्रपती पुतळ्यास पुष्पहार अर्पण अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.