पालकमंत्री भुजबळ व कृषीमंत्री भुसे यांचे आदेश; दीपिका चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
—
सटाणा : शहरातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये ४० ऑक्सिजन बेडचे कोविड रुग्णालय तातडीने कार्यान्वीत करावेत असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ व कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक येथे आज शुक्रवार (ता.३०) रोजी नाशिक येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी सुरज मांढरे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना दिले आहेत, अशी माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.
सटाणा शहर व बागलाण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत चालल्याने बाधितांसह त्यांच्या नातलगांना बेड्स मिळवण्यासाठी सर्वत्र धावाधाव करावी लागत आहे. मात्र बेड व ऑक्सिजन अभावी अनेकांना दुर्दैवाने जीव गमवावा लागला आहे. शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी डांगसौंदाणे येथे एकमेव कोविड सेंटर आहे, तर नामपुर येथे नव्याने कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळाली असली तरी ऑक्सिजन बेडअभावी ते कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातलगांना नाशिक व मालेगाव येथे ऑक्सिजन बेडसाठी धावाधाव करावी लागत आहे. मात्र तेथेही बेड व ऑक्सिजन शिल्लक नाहीत.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सटाणा शहरातील ट्रामा केअर सेंटर तसेच तालुक्यातील ताहाराबाद व अजमेर सौंदाणे येथे सर्व सोईसुविधांयुक्त ऑक्सीजन बेडची तीन कोविड सेंटर तत्काळ सुरू करून करण्याची मागणी करून माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी या गंभीर मुद्द्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री श्री.भुजबळ व कृषीमंत्री श्री.भुसे यांचे लक्ष वेधले होते.
नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजनांच्या आढावा बैठकीत शहरातील ट्रामा केअर सेंटरमध्ये ४० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश मिळाल्याने सटाणावासीयांना हक्काचे कोविड रुग्णालय मिळाले आहे, त्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाल्याचेही माजी आमदार सौ.चव्हाण यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बागलाण तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील रुग्णांसाठी ताहाराबाद येथे ३० खाटांचे कोविड विलगिकरण कक्ष सुरू करण्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे आदिवासी बांधवांची मोठी सोय होणार असल्याचेही सौ.चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.विठ्ठल येवलकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, रत्नाकर सोनवणे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत अहिरराव, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.एस.आर.बांगर, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे आदी उपस्थित होते.
ऑक्सिजन प्लांट उभारावेत यासाठी भेट घेणार