डांगसौंदाणे – तालुक्यातील चिकनगुनिया व डेंग्यूने त्रस्त जनतेला बागलाणची आरोग्य यंत्रणा उभारी देणार की साथ रोगाचा फैलाव कायम सुरू राहणार असाच प्रश्न आता तालुक्यातील जनतेला पडला आहे. कोविड नंतर लसीकरण मोहिमेच्या निमित्तााने व्यस्त असलेल्या आरोग्य यंत्रणेला बागलाणच्या तहसीलदारांनी बुस्टर डोस देत जागते केले आहे. तालुक्याच्या आरोग्याची जबाबदारी ज्यांची आहे ते नव्यानेच आले आहेत. तर जुन्या कर्मचारींना साथरोग कुठे सुरू आहे हेच माहिती नाही. त्यामुळे साथ रोग आटोक्यात आणण्यासाठी थेट तहसीलदारानीच यंत्रणेला सूचना केल्या आहेत. सध्या बागलाण तालुक्यात शहरासह तालुक्यातील असंख्य गावात साथ रोग सुरू आहे.
घरोघरी रुग्ण आढळून येत आहेत तर अनेकांना हजारो रुपये खर्च करून उपचार घ्यावे लागत आहेत. तालुक्यात ११ प्राथमिक आरोग्य केंद्र ५२ उपकेंद्रे यातील ४२ उपकेंद्रे हे आरोग्यवर्धिनी केंद्र आहेत. तर सटाणा शहरासह नामपूर व डांगसौंदाणे येथे ग्रामीण रुग्णालय आहे. तालुक्यात आरोग्य यंत्रणेकडे पुरेशा इमारती आणि यंत्रणा असताना मात्र आरोग्य सेवा एकदमच तोकडी मिळत असल्याची बाब समोर येत आहे. अनेक रुग्ण खाजगी रुग्णालय मध्ये उपचार घेऊन बरे होत असताना साथरोग प्रसार आणि त्याला आटकाव करण्यासाठी आरोग्य यंत्रणा नेमकी कुठे कमी पडत आहे. हा संशोधनाचा विषय आहे. सध्या कोविड लसीकरणावर यंत्रणेचा अधिक जोर असल्याने इतर आरोग्य सेवेवर त्याचा विपरित परिणाम झाल्याचे दिसून येते. कोरोना काळात आरोग्य यंत्रणेने केलेले काम जरी वाखाण्याजोगे असले तरी त्या नंतर यंत्रणेत आलेली मरगळ रुग्णांची नाराजी ओढविणारी ठरली आहे.
पश्चिम भागातील अनेक आदिवासी गावासह तळवाडे दिगर, किकवारी, जोरण, डांगसौंदाणे, भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळुन आले आहेत. स्थानिक ग्रामपंचायत व आरोग्य यंत्रणेने एकत्र येत, गावोगावी ही साथ रोग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणेच गरजेचे आहे. पण, ठराविक ग्रामपंचायती सोडल्या तर या साथ रोगाकडे इतर ग्रामपंचायतीनी ही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नुकतेच आलेल्या अधिकारीना आल्याबरोबर या साथरोगांचा सामना करण्याची वेळ आली आहे. गेले तीन वर्षे प्रभारी असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी मुळ आस्थापनेवर गेल्याने कोविड काळात आरोग्य यंत्रणा सांभाळणारे अनुभवी आरोग्य अधिकारी नसल्याने नव्याने आलेल्या तालुका आरोग्य अधिकारीना हा साथ रोग आटोक्यात आणावा लागणार आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेला कामाला लावावे लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने घरोघरी सर्वेक्षण, कोरडा दिवस पाळण्यासह स्थानिक ग्रामपंचायतीना सूचना करत डास निर्मूलन यासाठी आवश्यक फवारणी सह मोठ्या प्रमाणावर औषधासाठा उपलब्ध करीत रुग्ण सेवा द्यावी लागणार आहे. डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयाचे कोविड सेंटर बंद करून पश्चिम भागातील जनतेच्या इतर आरोग्य सेवेसाठी खुले करावे अशी मागणी होत असून याबाबतची मागणी ही जिल्हा शल्य चिकित्सकांकडे करण्यात आली आहे.
सुचना केल्या आहे
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना गटविकास अधिकारी यांचे मार्फत सुचना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गावोगावी ग्रामपंचायत प्रशासनाने डास निर्मूलनासाठी कीटकनाशक औषधाची फवारणी करावी धुरळनीयंत्राने फवारणी करून डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत कोरडा दिवस पाळावा तर आरोग्य यंत्रणेला गावोगावी सर्वेक्षण व पुरेसा औषधसाठा उपलब्ध करीत साथरोग आटोक्यात आणण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना केल्या आहेत.
जितेंद्र इंगळे पाटील (तहसीलदार, बागलाण)
……….
सर्व्हेक्षण व उपाययोजना करणार
मी नुकताच तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्यभार हाती घेतला आहे. तालुक्यात कोविड लसीकरणासह साथरोग प्रतिबंधसाठी सर्वेक्षण व त्यावरील उपाययोजना साठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीना सूचना दिल्या आहेत .
हर्षल महाजन,तालुका आरोग्य अधिकारी
…..
कोविड सेंटर तात्काळ बंद करावे
साथरोग सुरू असल्याने अनेक परिसरातील गावात रुग्ण आहेत डांगसौंदाणे भाग हा आदिवासी भाग असल्याने येथील गरीब रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात सुविधा उपलब्ध होत नसल्याने येथील कोविड सेंटर तात्काळ बंद करावे
संजय सोनवणे, संचालक बाजार समिती सटाणा
सदस्य रुग्ण कल्याण समिती ग्रामीण रुग्णालय डांगसौदाणे